लाईफस्टाईल

‘HIV पॉझिटिव्ह’ मुलांचा आधारवड; कुटुंबाने-गावाने झिडकारले, तरीही विस्तारले पंख

आजची दुर्गा - मनीषा गोस्वामी : वयाच्या पाचव्या वर्षी ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे समजल्यानंतर गावाकडून झिडकारली गेलेली आणि कुटुंबाने नाकारलेली राजस्थानमधील मनीषा गोस्वामी बालगृहात वाढली. अनाथांमध्येही अधिक अनाथ ठरणाऱ्या अशा मुलांसाठी आयुष्यभर काम करून त्यांचे जीवन घडवण्याचा निर्धार तिने केला आहे.

Swapnil S

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे

वयाच्या पाचव्या वर्षी ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे कळल्यावर मनीषाला गावाने झिडकारले, कुटुंबाने नाकारले आणि बालगृहात दाखल केले. ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असलेली निराधार मुले ही अनाथांमध्येही अधिक अनाथ असतात. ती कोणालाच नको असतात. म्हणून आपल्यासारख्या मुलांसाठीच आयुष्यभर काम करायचे, त्यांचे आयुष्य घडवायला मदत करायची, असा निर्धार राजस्थानमधील मनीषा गोस्वामीने केला आहे. आज ‘पॉझिटिव्ह युवा नेटवर्क असोसिएशन’ या संस्थेची ती सचिव आहे. ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ मुलामुलींबरोबरच ती विभिन्न लैंगिक ओळख असलेल्या तरुण-तरुणींसाठीही काम करत आहे.

मनीषाचा जन्म राजस्थानमधील अविकसित भाग असलेल्या करोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम खेडेगावात झाला. मोठे एकत्र कुटुंब होते. मनीषा पाच वर्षांची असताना तिच्या वडिलांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यांना ट्रिटमेंटसाठी जयपूरला नेण्यात आले. त्यावेळी कॅन्सरसोबतच ते ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ही आहेत, असे कळले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मनीषाचीही तपासणी करण्यात आली आणि तीही ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इथून मनीषाच्या संघर्षाला सुरुवात झाली. तिचे एकत्र कुटुंब आणि गावची पंचायत सभा या दोघांनीही मनीषाने आता गावात, घरात राहू नये, असे सांगितले. पाच वर्षांची मुलगी. आजवर आई-वडील आणि कुटुंब सोडून कधीच एकटी राहिली नव्हती. आपल्याला हे लोक घराबाहेर का काढताहेत, हेही तिला कळत नव्हते. सगळी प्रेमाची माणसे मौन झाली होती. पराधीन आई हतबल होती. पाच वर्षांच्या मनीषाला जयपूर येथील ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ मुलांसाठी काम करणाऱ्या बालगृहात दाखल करण्यात आले.

बालगृहात मनीषाचे शालेय शिक्षण सुरू झाले. एकट्या, एकाकी अवस्थेतील मनीषाने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. बालगृहातील ज्या मुलांचे पालक हयात होते, ते दर महिन्याला फोन करुन आपल्या मुलांची चौकशी करायचे. पण गावात मनीषाच्या आईकडे फोनही नव्हता. त्यामुळे ती फोन करत नव्हती. ना आई कधी तिला भेटायला आली. मनीषा वाट पाहत राहायची, पण कोणीच यायचे नाही. मात्र मनीषाची शिक्षणातील प्रगती पाहून बालगृहाने तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण केले. शिक्षण झाल्यावर मनीषा घरी गेली. पण त्याही वेळी तिच्या वाट्याला वंचनाच आली. विषादाने मनीषा सांगते, “मी माझ्या बालगृहातील अधीक्षकबाईंना ‘मम्मी’ म्हणायचे. ते कारण सांगून माझ्या आईने, माझ्या एकत्र कुटुंबाने मला अजूनही स्वीकारलेले नाही. शेवटी मी पुन्हा जयपूरला आले.”

अठरा वर्षानंतर निराधार मुलांना बालगृहातून बाहेर पडावे लागते. आता त्यांचा उघड्या जगातील संघर्ष सुरू होतो. जयपूरला आल्यावर मनीषासमोरही अनेक आव्हाने होती. राहण्या-खाण्यापासूनचा प्रश्न होता. त्याचदरम्यान तिला ‘उदयन केअर’ या संस्थेची ‘लिफ्ट फेलोशिप’ मिळाली. त्या पैशांवर ती जयपूर येथील आपल्या राहण्याचा-जेवणाचा खर्च भागवू शकली आणि मुख्य म्हणजे याच आर्थिक मदतीतून तिने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

आपल्या या प्रवासाविषयी बोलताना मनीषा सांगते, “या फेलोशिपच्या माध्यमातून मी माझ्यासारख्या अनेक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ मुला-मुलींच्या संपर्कात आले. एकूणच राज्यस्थानातील १४ बालगृह फिरल्यावर माझ्यासोबत काम करणाऱ्या कुशलने ‘पॉझिटिव्ह युवा नेटवर्क असोसिएशन, जयपूर’ या संस्थेची दोन वर्षांपूर्वी स्थापना केली. मीही मग कुशलसोबत या संस्थेत काम करायला सुरुवात केली. बालगृहांमधून बाहेर पडणाऱ्या सर्वसाधारण मुलांसोबत काम करणाऱ्या जयपूरमधील इतर नेटवर्कना समाजातील मोठ्या लोकांचा, संस्थांचा आर्थिक पाठिंबा मिळतो. आम्हाला तसा पाठिंबा नव्हता. सुरुवातीला मी आणि कुशल वेगवेगळ्या ठिकाणी कामे करुन आमच्या ‘पॉझिटिव्ह युवा नेटवर्क असोसिएशन’च्या माध्यमातून इतर मुलांना शिक्षण, निवारा यासारखी मदत मिळवून द्यायचो. आमचे हे काम पाहून नंतर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम करण्यासाठी आम्हाला देणग्या मिळत गेल्या. त्यामुळे आज आम्ही आमचे काम वाढवत आहोत.”

संस्थेच्या कामाचे स्वरुप अधिक व्यापक होतेय

बालगृहातून बाहेर पडलेल्या ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ मुलांना कायम आपली ओळख लपवून रहावे लागते. आपण ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ आहोत हे कळले तर लोक आपल्याला नाकारतील, म्हणून ती कायम तणावात असतात. परिणामी, आपला आजारही ती लपवतात. मनीषाही या सगळ्यातून गेलेली असल्याने तिला या ताणाची जाणीव आहेच. त्यामुळेच ती काम करत असलेल्या ‘पॉझिटिव्ह युवा नेटवर्क असोसिएशन’ने आतापर्यंत १२०० ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ मुलामुलींना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत केली आहे. “आपल्या संस्थेच्या कामाला आता वेग येत असून कामाचे स्वरुप व्यापक होत आहे. आम्ही आता विभिन्न लैंगिक ओळख असलेल्या मुलामुलींसाठीही काम करत आहोत.,” असे मनीषा सांगते.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत