पॅकेटमधले नाही तर ताज्या मक्यापासून बनवा कुरकुरीत पॉपकॉर्न; वाचा सोपी रेसिपी 
लाईफस्टाईल

पॅकेटमधले नाही तर ताज्या मक्यापासून बनवा कुरकुरीत पॉपकॉर्न; वाचा सोपी रेसिपी

ताज्या मक्यापासूनही घरच्या घरी कुरकुरीत आणि चविष्ट पॉपकॉर्न तयार करता येतात. योग्य पद्धतीने दाणे वाळवून घेतल्यास हा स्नॅक अधिक नैसर्गिक आणि स्वादिष्ट लागतो.

किशोरी घायवट-उबाळे

पॉपकॉर्न हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता स्नॅक आहे. चित्रपट पाहताना, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा छोट्या गेट-टुगेदरसाठी पॉपकॉर्न हा अनेकांचा पहिला पर्याय असतो. बहुतेक जण बाजारातून तयार पॉपकॉर्नचे दाणे विकत आणतात. मात्र, ताज्या मक्यापासूनही घरच्या घरी कुरकुरीत आणि चविष्ट पॉपकॉर्न तयार करता येतात. योग्य पद्धतीने दाणे वाळवून घेतल्यास हा स्नॅक अधिक नैसर्गिक आणि स्वादिष्ट लागतो.

पॉपकॉर्नसाठी योग्य मका निवडा

पॉपकॉर्न तयार करण्यासाठी पूर्णपणे परिपक्व आणि दाणे घट्ट झालेला मका निवडणे महत्त्वाचे आहे. ताज्या आणि पूर्ण वाढ झालेल्या मक्याचे दाणे पॉपकॉर्नसाठी अधिक योग्य ठरतात.

मक्याचे दाणे व्यवस्थित वाळवा

ताज्या मक्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे प्रथम मक्यावरील साल काढून कणसे हवेशीर ठिकाणी काही आठवडे वाळत ठेवा. दाणे पूर्णपणे कडक झाल्यानंतरच त्यांचा वापर करा.

दाणे वेगळे करून साठवून ठेवा

मका व्यवस्थित वाळल्यानंतर कणसावरील दाणे अलगद काढून घ्या. हे दाणे हवाबंद डब्यात दोन-तीन दिवस ठेवून द्या. त्यामुळे त्यातील आर्द्रता संतुलित राहते आणि पॉपकॉर्न चांगले फुलतात.

साहित्य :

  • १ कप वाळवलेले मक्याचे दाणे

  • १ टेबलस्पून तेल

  • चवीनुसार मीठ

  • आवडीनुसार लोणी, चीज पावडर किंवा हर्ब्स

कृती :

गॅसवर खोल तवा किंवा जाड बुडाचे पातेले गरम करा. त्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर मक्याचे दाणे टाका. झाकण लावून मध्यम आचेवर शिजू द्या. काही वेळात दाणे फुटून पॉपकॉर्न तयार होऊ लागतील. फुटण्याचा आवाज कमी झाल्यावर गॅस बंद करा. तयार पॉपकॉर्न एका भांड्यात काढा.

आवडीनुसार द्या वेगवेगळा फ्लेवर

तयार पॉपकॉर्नमध्ये मीठ, वितळलेले लोणी, चीज पावडर, मिक्स हर्ब्स किंवा चाट मसाला घालून चव वाढवू शकता. मुलांसाठी कॅरमेल पॉपकॉर्नचाही पर्याय निवडू शकता.

टिप्स :

  • दाणे पुरेसे वाळले नसतील तर पॉपकॉर्न नीट फुटणार नाहीत.

  • पॉपकॉर्न बनवताना झाकण उघडू नका.

  • जास्त आचेवर शिजवल्यास दाणे जळू शकतात.

  • हवाबंद डब्यात साठवलेले दाणे अधिक काळ टिकतात.

योग्य पद्धतीने तयार केलेले ताज्या मक्याचे पॉपकॉर्न हे बाजारातील पॅकेज्ड स्नॅक्सपेक्षा अधिक ताजे, चविष्ट आणि आरोग्यदायी ठरू शकतात.

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी

भरती परीक्षेतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी

Mumbai : 'लक्ष्मी निवास 'च्या जागी २१ मजली टॉवर होणार

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पाणी घेणेही थांबवले