

संध्याकाळच्या वेळी भूक लागली तर अनेकदा तळलेले आणि अनहेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, अशावेळी घरच्या घरी बनवलेली मसूर डाळ टिक्की हा एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. प्रोटीनने समृद्ध मसूर डाळ, पनीर आणि ताज्या भाज्यांचा वापर करून तयार होणारी ही टिक्की आरोग्यदायी असूनही खूप टेस्टी लागते.
मसूर डाळ पटकन शिजते आणि स्नॅकसाठी उत्तम बेस ठरते. थोडीशी दाणेदार पेस्ट करून बनवलेली टिक्की बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागते. पनीरमुळे चव वाढते, तर भाज्यांमुळे ताजेपणा आणि हलका क्रंच मिळतो.
साहित्य :
१ कप मसूर डाळ
१/२ कप किसलेले पनीर
१ छोटा कांदा (बारीक चिरलेला)
१ गाजर (किसलेले)
१ सिमला मिरची (बारीक चिरलेली)
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून आलं पेस्ट
२ टेबलस्पून कोथिंबीर
२ टेबलस्पून बेसन (गरजेनुसार)
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून जिरे पावडर
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून तेल (शॅलो फ्रायसाठी)
कृती :
मसूर डाळ स्वच्छ धुवून सुमारे १ तास भिजत ठेवा. यामुळे डाळ मऊ होते आणि सहज वाटता येते. पाणी काढून डाळ थोडी दाणेदार पेस्ट होईल अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घ्या. जास्त गुळगुळीत पेस्ट करू नका. वाटलेली डाळ एका भांड्यात काढून त्यात पनीर, कांदा, गाजर, शिमला मिरची, हिरव्या मिरच्या, आलं पेस्ट आणि कोथिंबीर घाला. नीट मिक्स करा. मीठ, लाल तिखट आणि जिरे पावडर घाला. मिश्रण पातळ वाटल्यास त्यात थोडे बेसन घालून मिक्स करा.
त्यानंतर, लहान-लहान भाग घेऊन गोल आणि थोडी सपाट टिक्की तयार करा.पॅनमध्ये थोडे तेल घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत टिक्की शॅलो फ्राय करा.
गरमागरम मसूर डाळ टिक्की पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा दह्याच्या डिपसोबत सर्व्ह करा. हलका सॅलड जोडल्यास हे पूर्ण आणि संतुलित स्नॅक ठरते.
'या' टिप्समुळे टिक्की होईल आणखी कुरकुरीत
डाळ जास्त बारीक करू नका, दाणेदार टेक्सचर ठेवा.
भाज्या जास्त ओलसर नसाव्यात.
मध्यम आचेवरच शॅलो फ्राय करा.
बेसन कमी प्रमाणात वापरा, नाहीतर चव बदलू शकते.
टिक्की ताजीच तळून खाल्ल्यास अधिक कुरकुरीत लागते.