लाईफस्टाईल

शिल्लक साबणाचे तुकडे फेकू नका! अशा प्रकारे तयार करा पेपर सोप

घरात उरलेल्या साबणाच्या तुकड्यांपासून घरीच पेपर सोप तयार करता येतात. हा उपाय सोपा, स्वस्त आणि प्रवासातही उपयोगी पडणारा आहे. जाणून घ्या पेपर सोप तयार करण्याची सोपी पद्धत.

Mayuri Gawade

घरात अनेकदा साबणाचे छोटे छोटे तुकडे उरतात आणि ते सरळ कचर्‍यात जातात. पण थोडी कल्पकता वापरली, तर हाच उरलेला साबण पुन्हा उपयोगात आणता येऊ शकतो. विशेष म्हणजे, या तुकड्यांपासून घरीच पेपर सोप तयार करता येतात. त्यामुळे पैशांची बचत होतेच, शिवाय छोट्या गोष्टींचा पुनर्वापरही करता येतो.

बाजारात मिळणारे पेपर सोप सोयीचे असतात, पण ते तुलनेने महागही पडू शकतात. अशावेळी घरात उरलेल्या साबणाच्या तुकड्यांपासून तयार केलेले पेपर सोप हा एक सोपा, किफायतशीर आणि उपयोगी पर्याय ठरू शकतो. बाहेर जाताना, ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा प्रवासात हात धुण्यासाठी हे पेपर सोप खूप उपयोगी पडतात.

काय लागेल?

हे पेपर सोप तयार करण्यासाठी फार काही विशेष साहित्य लागत नाही. घरात उरलेले साबणाचे तुकडे, थोडंसं पाणी, किसणी, एक छोटा पॅन किंवा बाऊल, बटर पेपर किंवा प्लास्टिक शीट आणि चमचा किंवा ब्रश एवढंच साहित्य पुरेसं ठरतं.

कसे तयार कराल?

सुरुवातीला उरलेले साबणाचे तुकडे किसणीने बारीक किसून घ्या. त्यामुळे ते लवकर वितळतात आणि मिश्रण एकजीव होण्यास मदत होते.

यानंतर किसलेला साबण छोट्या पॅनमध्ये घ्या. त्यात एक ते दोन चमचे पाणी घालून मंद आचेवर गरम करा. साबण हळूहळू वितळत जाऊन पेस्टसारखा होईल.

हे मिश्रण तयार झाल्यावर ते बटर पेपर किंवा प्लास्टिक शीटवर अतिशय पातळ थरात पसरवा. थर जाड होणार नाही, याची काळजी घ्या. नंतर तो तीन ते चार तास किंवा पूर्ण सुकून जाईपर्यंत तसेच ठेवून द्या.

मिश्रण पूर्ण सुकल्यावर त्याचे छोटे चौकोनी किंवा आयताकृती तुकडे कापा. अशा प्रकारे तुमचे घरगुती पेपर सोप तयार होतील.

का ठरेल उपयोगी?

हे तयार केलेले छोटे तुकडे एखाद्या डब्यात किंवा छोट्या बॉक्समध्ये ठेवून सहज जतन करता येतात. बाहेर पडताना, प्रवासात किंवा अचानक हात धुण्याची गरज भासली, तर हे पेपर सोप खूप उपयोगी ठरतात. तसेच पुन्हा पुन्हा साबण विकत घेण्याची गरजही काही प्रमाणात कमी होऊ शकते.

घरात उरणाऱ्या साबणाच्या तुकड्यांकडे आता कचरा म्हणून पाहू नका. थोडा वेळ आणि साधं साहित्य वापरून त्यापासून पेपर सोप तयार करता येतात. हा उपाय सोपा, स्वस्त आणि दैनंदिन वापरासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतो.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड