- विचारभान
- संध्या नरे-पवार
सर्व जातीधर्मांपल्याडच्या अंतिम तत्त्वाचा, सत्याचा शोध घेताना कबीर राम या तत्त्वाशी थांबतात आणि रामाचे प्रचलित अर्थ सांगतानाच खरा राम कसा असतो, असायला हवा, हेही तो स्पष्ट करतात. दोहे, साखी या त्यांच्या सगळ्या रचनांमध्ये खरा राम सापडावा, हीच आस आहे. चराचरात सामावलेलं रामतत्त्व सापडावं ही कबीराची आस आज कुठे हरवली आहे?
“राम भरोसे गिनै काहू,
सब मिली राजा रंक रिसाऊ
राखनहारा राम है,
मारि सकै न कोई
पातिस्याहू न डरुं, करता करै सो होई...”
रामाच्या सान्निध्यात असताना सम्राटाचीही भीती वाटत नाही. ज्याचा राखणदार राम आहे, त्याला कोण मारणार? असा प्रश्न विचारणारे संत कबीर इथे हुकूमशाहीला, एकाधिकारशाहीला रामाच्या बळावर तोंड देत आहेत. पंधराव्या शतकात महंमद लोधीची दिल्लीवर सत्ता असतानाच्या कार्यकाळात काशीत राहणारे कबीर मौलाना सांगत असलेला इस्लाम आणि पांडे-पंडित सांगत असलेले वेद या सगळ्यावर टीका करत होते.
“भाई रे दो जगदीश कहाँ से आया, कहु कौने बौराया
अल्ला राम करीमा केसव, हरि हजरत नाम धराया
गहना एख कनक ते गहना, जामे भाव न दूजा...”
- “अरे भावा, हे दोन जगदीश आले कुठून? तुला कोणी हे वेड लावले? अल्ला, राम, करीम, केशव, हरी, हजरत..अशी वेगवेगळी नावं आहेत त्या एकाच जगदीशाची. जसे एकाच सोन्यापासून वेगवेगळे दागिने घडवले जातात”, असे कबीर आपल्या दोह्यांमधून सांगत असत आणि नमाज व पूजा, महादेव व महम्मद एकच आहे, याचा वारंवार उच्चार करत असत.
“अनजाने को स्वर्ग नरक है, हरि जाने को नाही...” म्हणजेच जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी स्वर्ग आणि नरक आहेत, जो हरीला जाणतो त्याच्यासाठी नाही. असे सांगून ‘सो डर हमरे नाहीं’- मी कोणालाही घाबरत नाही, असे ते सांगत असत. ईश्वराच्या भक्तीला श्रेष्ठत्व देऊन कबीर स्वर्ग-नरकाची संकल्पनाच नाकारतात आणि ज्या स्वर्ग-नरकाची सामान्यांना भीती दाखवून मौलाना आणि पंडित आपली दुकाने चालवत असत त्यांच्यापुढे पेच निर्माण करतात. असे संतप्त झालेले मौलाना आणि पंडित एकत्र येतात आणि कबीरांची तत्कालीन सुलतानाकडे तक्रार करतात. धार्मिक मूलतत्त्ववाद स्वत:च्या सोयीसाठी गरज पडेल तेव्हा कसा एकत्र येतो आणि कबीरासारख्या तत्त्वज्ञाला, संताला कसा पाखंडी ठरवतो, याचे हे पंधराव्या शतकातले उदाहरण आहे. कबीर मात्र ज्याचा राखणदार राम आहे, तो पातशहाला घाबरत नाही, असे शांतपणे सांगत आहेत. मुळात कबीर या दोन्हीकडच्या मूलतत्त्ववाद्यांना बरोबर ओळखून आहे. म्हणूनच त्यांना उघडं पाडत कबीर म्हणतात,
“हिन्दू कहै राम हमारा, तुरक कहे रहमाना
आपस में दोऊ लडत मरत है, मरम न काहू जाना...”
राम म्हणजे काय, रहीम म्हणजे काय, याचे मर्म न जाणता, त्याचा गाभा लक्षात न घेता हे दोघं आपापसात भांडत बसतात, असे कबीर सांगतात. हे मर्म कसं जाणायचं, तर ते खऱ्या भक्तीने जाणायचं, असंही कबीर सांगतात.
“ज्यूं जल में पैस न निकसै यूं हरि मिल्या जुलाहा
राम भगति परि जाकौ हित चित्त, ताकौ अचिरज काहा...”
जसं पाण्यात पाणी मिसळतं तसा मी माझ्या हरीत सामावलेला आहे. ही अवस्था कशी प्राप्त होते हे सांगताना कबीर म्हणतात, मनापासून जो कोणी रामाची भक्ती करेल तो ही मनोवस्था प्राप्त करू शकतो. मौलाना सांगत असलेलं कुराण आणि पंडित सांगत असलेले वेद यांच्यापेक्षा उच्च स्थानी कबीर भक्तीला नेतात. मौलाना आणि पंडित दोघेही कबीरांच्या विरोधात जातात, त्यामागचं मुख्य कारण हेच होतं. कबीर सगळी कर्मकांड नाकारतात, शब्दप्रामाण्य नाकारतात आणि भक्तीच्या मार्गाने हरीमध्ये, अल्लामध्ये विलीन होणं स्वीकारतात. जे क्षेत्र विशिष्टांसाठी राखीव होतं ते क्षेत्र कबीरांसारखे संत भक्तीला सार्वजनिक करत सर्वांसाठी खुलं करतात. भेदाभेद नाकारतात, अस्पृश्यता धिक्कारतात.
कबीर जन्माने हिंदू का मुस्लिम हा वाद मध्ययुगापासून कायम आहे. त्यांच्या जन्माशी वेगवेगळ्या कथा जोडल्या गेल्या आहेत. कधी दोन्ही बाजू त्यांच्यावर दावा करतात, तर कधी दोन्ही बाजू त्यांना धिक्कारतात. पण कबीर काय सांगतात ते अधिक महत्त्वाचे आहे. मी कोण? हे सांगताना कबीर म्हणतात,
“कबीर पंगुडा अलह राम का, हरी गुर पीर हमारा...”
मी अल्ला आणि राम या दोघांचंही बाळ आहे, हे सांगणाऱ्या या तत्त्वज्ञाचं लक्ष आहे ते या दोन्ही नामांमध्ये सामावलेल्या अर्थबोधाकडे, सत्याकडे. म्हणूनच कबीरांचा राम हा निर्गुणी राम आहे, निराकार आहे, सर्वव्यापी आहे, चराचरात सामावलेला आहे. हिंदू-मुस्लिम, स्पृश्य-अस्पृश्य या भेदांच्या पलीकडे जात भक्तीच्या क्षेत्रात कबीर पारंपरिक रामनामात व्यापक तत्त्व शोधतात. म्हणूनच ते रामाचे वेगवेगळे प्रकारही स्पष्ट करतात.
“एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा...
एक राम का सकल पसारा, एक राम त्रिभुवन से न्यारा...
तीन राम को सब कोई धयावे, चतुर्थ राम को मर्म न पावे...”
इथे कबीर सांगतात की, दशरथाचा पुत्र असलेला राम म्हणजेच देहधारी राम. हा पहिला राम. प्रत्येक घटा-घटात म्हणजे समस्त सृष्टीत सामावलेलं जीव तत्त्व म्हणजे दुसरा राम. सर्व सृष्टी हे ज्या अव्यक्ताचं व्यक्त रूप आहे, ते आत्मतत्त्व म्हणजे तिसरा राम. पण तिन्ही लोकांहून न्यारा, वेगळा असलेला राम म्हणजे परमात्मा. म्हणजे अंतिम सत्य. राम या तत्त्वाचे वेगवेगळे अर्थ सांगत कबीर पुढे म्हणतात की, सगळे पहिल्या तीन रामांपर्यंत पोहोचतात; पण चौथ्या रामाचं, परम तत्त्वाचं मर्म मात्र कोणी जाणत नाही.
हे परम तत्त्व कसं जाणायचं, त्यापर्यंत कसं पोहोचायचं, हेही कबीर आपल्या वेगवेगळ्या रचनांमधून स्पष्ट करतात. ते या परम तत्त्वाला गुढामध्ये बंदिस्त करत नाहीत, तर विवेकाच्या आधारे शुद्ध मनाने सहजपणे आपल्याला या चौथ्या रामतत्त्वाशी एकरूप होता येतं हे कबीर सांगतात. कबीराचं अनोखेपण, त्यांच्या कथनाची मौलिकता या ‘सहज विवेका’च्या तत्त्वात आहे. विवेक हे तत्त्व आधुनिक बुद्धिप्रामाण्यवादातून विकसित झालं, अशी सर्वसाधारण समजूत असते. पण विवेक या तत्त्वाचा उच्चार या भारतीय मातीत कबीरांनी पंधराव्या शतकातच केलेला आहे. जर तुम्ही विवेकाने वास्तवाकडे पाहिलंत तर तुम्हाला चराचरात राम दिसेल. मग कोणी स्पृश्य राहणार नाही, कोणी अस्पृश्य राहणार नाही. कोणी श्रेष्ठ वर्णाचा असणार नाही, की कोणी शूद्र वर्णाचा असणार नाही.
“वैष्णव भया तो क्या भया, बुझा नहीं विवेक
छापा तिलक बनायके, दग्ध्या लोक अनेक...”
इथे कबीर सांगताहेत, “तुम्ही केवळ प्रतीकं दाखवून वैष्णव असल्याचा दिखावा करता, तुमच्याकडे विवेक नाही, तुम्ही लोकांना फसवण्याशिवाय दुसरे काही करत नाही.” अविवेकी माणसंच धर्माचा आधार घेत सामान्य जनांना लुबाडतात, हे सांगत कबीर इथे विवेकाचं महत्त्व अधोरेखित करतात.
मनातील अशुद्ध भाव दूर करून चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यातील फरक ओळखणे म्हणजे विवेक. पण केवळ विवेक असून चालत नाही, तर हा विवेक ‘सहज’ असायला हवा, असेही कबीर सांगतात आणि या सहज विवेकाचे प्रतीक म्हणून ते ‘राम’ या नावाची निवड करतात.
“सहज सुभाव मिले राम राई...”
विवेकाच्या सरावाने जेव्हा विवेक हाच तुमचा सहज स्वभाव होतो तेव्हा रामाची प्राप्ती होते. कबीरासाठी राम काय आहे हे सांगताना आपल्या ‘कबीर’ या ग्रंथात पुरुषोत्तम अग्रवाल सांगतात, “रामभक्ती ही कबीराने आपल्या धर्माची कसोटी मानली आहे. राम हा कबीराचा कळीचा शब्द आहे. राम म्हणजे काही ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तिमत्त्व किंवा देवता नाही. राम हे माणसाच्या विवेकबुद्धीला त्याने दिलेले नाव आहे. कबीराच्या रामाशी जोडलं जाणं म्हणजे केवळ हिंदू असणं नव्हे, तर ते माणूस असणं आहे. त्याचबरोबर देवत्वाशी व इतर माणसांशी स्वत:ला जोडून घेणं (भक्ती) हे देखील आहे. त्यामुळे कबीर पांडे नावाच्या ब्राह्मणाला त्याचा वेदाभ्यासाचा संदर्भ देऊन सांगतो, की प्रत्येकात राम पाहायला शिक.
बेद पढया का यह फल पांडे
सब घटि देखो राम..”
सहज विवेक म्हणजे नैसर्गिक, स्वत:चं शहाणपण आणि ज्ञान यामध्ये रुजून आलेल्या भक्तीचा मार्ग, असेही अग्रवाल स्पष्ट करतात. कबीराची भक्ती ही लोकानुनयी भक्ती नव्हती, तर त्याउलट विवेकावर आधारलेली होती. म्हणूनच कबीराचा राम हा कोणत्याही धर्माचं मूल्यमापन करणारा एक मार्ग व्हायला हवा, असं अग्रवाल सांगतात. कबीर विवेकासाठी, स्वभान जागृतीसाठी राम हे भारतीय मातीतील प्रतीक स्वीकारतात आणि त्याला अतिशय व्यापक, सर्वसमावेशक करतात. कबीरांचा राम हा वर्णसंघर्षातला राजा राम नाही, तर तो अस्तित्वाचं व्यापक तत्त्व म्हणून येतो. कबीर राम हे प्रारूप स्वीकारून धार्मिक मूलतत्त्ववादाला प्रश्न विचारतात. कबीरांनी रामाशी थेट व्यक्तिगत नातं विकसित केलं आहे. त्यांनी आपली भक्ती विवेकासोबत जोडून घेतली. विवेकाला महत्त्वाचं स्थान दिलं. कबीरांना सापडलेलं मर्म म्हणजे राम चराचरात आहे. किंबहुना जे चराचरात सामावलेलं आहे, त्यालाच त्यांनी राम हे नाव दिलं आहे. पण हे फक्त आध्यात्मिक पातळीपुरतं मर्यादित नाही. कबीर आपल्या विवेकाने वास्तवाकडे पाहतात आणि मग प्रश्न विचारतात की, जर राम सगळीकडे आहे, जर तो जगजीवन आहे आणि शुद्ध मन व हृदयाच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचता येते, जर तो आणि मी दोघंही सारखे आहोत, तर मग काही लोकांना त्यांचा गुन्हा नसतानाही अस्पृश्य का बरं ठरवलं गेलं आणि काही लोकांनी काही विशेष केलेलं नसतानाही त्यांना का बरं आदरणीय, सन्माननीय ठरवण्यात आलं.
अर्थात या सर्वव्यापी रामापर्यंत पोहोचणं सोपं नाही, याची जाणीव कबीरांना आहे. म्हणूनच ते म्हणतात,
“जेहि मारग गये पण्डिता, तेई गई बहीर।
ऊँची घाटी राम की, तेहि चढ़ि रहै कबीर...”
- ज्या रस्त्याने पंडित लोक जातात, त्या रस्त्यावरून त्यांच्या मागोमाग सामान्यांची गर्दीही जाते. पण स्वरूपस्थित रामाचा पहाड मात्र उंच आहे आणि कबीर तोच पहाड चढत आहे.
पंडितांचा, स्वत:ला विश्वगुरू म्हणवणाऱ्यांचा मार्ग नाकारून घटाघटात सामावलेल्या सर्वव्यापी, स्वरूपस्थित रामाचा पहाड चढण्याची कितीजणांची तयारी आहे? रामनवमी साजरी करताना या प्रश्नाचं उत्तर जरुर शोधायला हवं आणि कबीरांचा राम अंशत: तरी समजून घ्यायला हवा.
sandhyanarepawar@gmail.com