जेवणाची चव वाढवणारा किसलेल्या कैरीचा गोड-तिखट मुरांबा; एकदा ट्राय कराच! 
लाईफस्टाईल

जेवणाची चव वाढवणारा किसलेल्या कैरीचा गोड-तिखट मुरांबा; एकदा ट्राय कराच!

जेवणासोबत, पोळीबरोबर किंवा अगदी नाश्त्यातही खाता येणारा हा मुरांबा चवीला जितका भन्नाट, तितकाच बनवायला सोपाही आहे.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा सुरू झाला की घराघरांत कैरीच्या विविध पदार्थांचा सुगंध दरवळू लागतो. कैरीचं पन्हं, लोणचं, चटणी यांसोबतच गोड-तिखट चवीचा किसलेल्या कैरीचा मुरांबा हा देखील अनेकांचा आवडता पारंपरिक प्रकार आहे. जेवणासोबत, पोळीबरोबर किंवा अगदी नाश्त्यातही खाता येणारा हा मुरांबा चवीला जितका भन्नाट, तितकाच बनवायला सोपाही आहे. उन्हाळ्यात कैरीचा साठा करून ठेवायचा असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य :

  • कच्ची कैरी - ५०० ग्रॅम

  • साखर - ५०० ग्रॅम

  • मीठ - चवीनुसार किंवा १ टीस्पून

  • हळद - पाऊण टीस्पून

  • दालचिनी - १ इंचाचे २ तुकडे

  • लवंग - ३ ते ४

  • जिरेपूड - अर्धा टीस्पून

  • लाल तिखट - १ टेबलस्पून

  • काळं मीठ - अर्धा टीस्पून

कृती :

सर्वप्रथम कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुऊन सोलून घ्या. त्यानंतर त्या किसणीने बारीक किसून घ्या. किसलेली कैरी एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात मीठ आणि हळद घालून हलकेच एकत्र करा. हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा.

आता एका जाड बुडाच्या पातेल्यात किसलेली कैरी आणि साखर घाला. मंद आचेवर हे मिश्रण शिजू द्या. साखर वितळू लागली की कैरीतून पाणी सुटेल. मिश्रण सतत हलवत राहा, म्हणजे ते तळाला लागणार नाही.

यानंतर त्यात दालचिनी, लवंग, जिरेपूड, लाल तिखट आणि काळं मीठ घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत नीट ढवळा. मिश्रण हळूहळू घट्ट होत जाईल आणि मुरांब्याला चमकदार पोत येऊ लागेल.

मुरांबा थोडा घट्ट आणि चिकटसर झाला की गॅस बंद करा. पूर्ण थंड झाल्यावर स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.

टिप्स :

  • मुरांब्यासाठी आंबट आणि घट्ट कैरी वापरल्यास चव अधिक छान लागते.

  • साखरेचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी-जास्त करू शकता.

  • मुरांबा शिजवताना सतत हलवत राहा, म्हणजे तो करपत नाही.

  • पूर्ण थंड झाल्यानंतरच बरणीत भरा, अन्यथा ओलसरपणा येऊ शकतो.

  • कोरड्या आणि स्वच्छ बरणीत भरल्यास मुरांबा जास्त दिवस टिकतो.

गोड-तिखट चवीचा परफेक्ट उन्हाळी साठा

किसलेल्या कैरीचा मुरांबा हा गोड, तिखट आणि हलक्या मसाल्याच्या चवीचा परफेक्ट संगम आहे. पोळी, पराठा, थेपला किंवा साध्या वरण-भातासोबतही हा मुरांबा अप्रतिम लागतो. उन्हाळ्यात कैरीचा स्वाद जास्त दिवस जपून ठेवायचा असेल, तर हा पारंपरिक पदार्थ नक्की करून पाहा.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल