इंडो-चायनीज पदार्थांची चव अशी काही असते की, एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. फ्राईड राईस, मंचूरियन, नूडल्स… आणि त्यातलंच एक चविष्ट नाव म्हणजे ‘सोया चिली’! साधं सोयाबीन जे तुम्हाला भाजीमध्ये आवडत नाही, तेच या रेसिपीत एवढं झणझणीत आणि टेस्टी होतं की, तुम्ही पुन्हा पुन्हा ही डिश बनवायला लागाल. विशेष म्हणजे ही डिश फक्त स्वादिष्ट नाही, तर प्रथिनांनी भरलेली आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
सोयाबीन - १ कप
कांदा - १ मोठा (बारीक चिरलेला)
ढोबळी मिरची - १ कप (हिरवी, लाल, पिवळी – लांब काप)
लसूण - ५ ते ६ पाकळ्या (चिरलेल्या)
आले - १ इंच तुकडा (किसलेला)
हिरवी मिरची - २ (लांब काप)
टोमॅटो सॉस - २ टेबलस्पून
सोया सॉस - १ टेबलस्पून
चिली सॉस - १ टेबलस्पून
व्हिनेगर - १ टीस्पून
कॉर्नफ्लोअर - १ टेबलस्पून (थोड्या पाण्यात मिसळून)
मीठ, मिरेपूड - चवीनुसार
तेल - २ टेबलस्पून
कांद्याच्या पाती - सजावटीसाठी
सर्वप्रथम सोयाबीन कोमट पाण्यात २० मिनिटं भिजवून थोडं मीठ घालून ५-७ मिनिटं उकळा. नंतर थंड पाण्याने धुवून पाणी गाळा. एका पॅनमध्ये तेल गरम करून शिजवलेले सोयाबीन हलके सोनेरी होईपर्यंत परता. दुसऱ्या कढईत तेल गरम करून आले, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परता. कांदा पारदर्शक झाला की ढोबळी मिरची घाला आणि थोडं शिजवा.
आता त्यात टोमॅटो, सोया आणि चिली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि मिरेपूड टाका. या सॉसमध्ये तळलेले सोयाबीन घालून नीट मिसळा. नंतर थोडं कॉर्नफ्लोअरचं पाणी घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळा. वरून कांद्याच्या पातीची सजावट करून गरमागरम ‘सोया चिली’ सर्व्ह करा.
सॉसचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी-जास्त करू शकता.
जर डिश अधिक क्रिस्पी हवी असेल, तर सोयाबीन आधी थोडं कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून तळा.
आरोग्यदायी पर्याय म्हणून ऑलिव्ह ऑईल वापरा.