हर हर महादेव! आज बुधवार (दि.२६) महाशिवरात्री आहे. या दिवशी संपूर्ण वातावरण शिवभक्तीमय होऊन जाते. सर्व शिवभक्त या दिवशी उपवास आणि पूजापाठ करतात. हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यादिवशी शिवपिंडीवर अभिषेक करून पूजा केली जाते. मात्र, धार्मिक मान्यतेप्रमाणे शिवाची पूजा करताना शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करून पूजा करण्याला महत्त्व आहे.
धार्मिक साहित्यात महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण करण्याचे महत्त्व विशद करताना व्याध आणि हरिणाची एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. या कथेनुसार व्याध जंगलात शिकारीवर गेला असताना त्याला शिकारच मिळाली नाही. त्यामुळे त्याचा उपवास घडला. तर रात्री जेव्हा त्याला शिकार मिळाली तेव्हा हरिणांनी त्याला काही वेळासाठी सोडण्याची विनंती केली. त्याने दया करून ती विनंती मान्य केली. त्याच वेळी तो झाडावर बसून त्या हरिणांची वाट पाहत राहिला. या दरम्यान तो झाडांची पाने तोडून खाली टाकत होता. त्याठिकाणी शिवाची पिंड होती. ते बेलपत्र होते. व्याधाच्या हातून नकळतपणे बेलपत्र वाहिले गेले आणि हरिण देखील प्रामाणिकपणे परत आले. त्यावेळी भगवान शिव प्रकट होऊन त्यांना आकाशात स्थान दिले. तेच आकाशातील व्याध तारा आणि मृग नक्षत्र आहे, असे मानले जाते. शिवाची पूजा करताना बेलपत्र अर्पण करताना 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा.
शिवपिंडीवर नेहमी तीन पत्र असलेलेच बेलपत्र अर्पण करावे.
बेलपत्र नेहमी ३,७,११ किंवा २१ अशा विषम संख्येत अर्पण करायचे असते.
बेलपत्र अर्पण करताना हे बेलपत्र चांगले असल्याची खात्री करून घ्या. बेलपत्र चांगले धुवून मगच अर्पण करावे. तसेच बेलपत्र कुठून कापले गेलेले नाही किंवा डागाळलेले नाही ना याची खात्री करून घ्या.
बेलपत्र अर्पण करताना कायम ताजे बेलपत्र अर्पण करावे. जुने वाळलेले बेलपत्र अर्पण करू नये.
बेलपत्र अर्पण करताना जर त्याला चंदन लावले तसेच त्यावर ओम असे लिहिले तर ते अधिक चांगले मानले जाते.
बेलपत्र अर्पण करताना ओम नमःशिवायचा जप सुरू ठेवावा.
शिवपिंडीवर बेलपत्र चढवण्याचा क्रम देखील ठरलेला आहे. सर्वप्रथम शिवपिंडीवर जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करावा. त्यांतर ताजे, स्वच्छ आणि धुतलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावे. मुखाने ओम नमःशिवायचा जप सुरू ठेवावा.