संपूर्ण देशात आज महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भाविक मनोभावे पूजापाठ करतात. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. माघ महिन्यातील वद्य चतुर्दशी ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. या रात्री भगवान शिवानी तांडव नृत्य केले होते. याला शिवाचे ब्रह्मांडीय नृत्य असेही म्हणतात. यादिवशी मनोभावे व्रताचरण करून शिवाची पूजा केल्याने शिवलोक किंवा मोक्षाची प्राप्ती होते, असे भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून नंतर ओम नमःशिवायचा जप करत बेलपत्र वाहून पूजा केली जाते.
धार्मिक मान्यतेप्रमाणे शिवाची पूजा करताना शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करून पूजा करण्याला महत्व आहे. त्याशिवाय शिवाची पूजा पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. शिवपिंडीवर बेलपत्र वाहताना काही नियम आहेत त्याप्रमाणे बेलपत्र वाहून पूजा केल्यास भगवान शिवाची कृपादृष्टी प्राप्त होते. धार्मिक साहित्यात महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण करण्याचे महत्त्व विशद करताना व्याध आणि हरिणाची एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. या कथेनुसार व्याध जंगलात शिकारीवर गेला असताना त्याला शिकारच मिळाली नाही. त्यामुळे त्याचा उपवास घडला. तर रात्री जेव्हा त्याला शिकार मिळाली तेव्हा हरिणांनी त्याला काही वेळासाठी सोडण्याची विनंती केली. त्याने दया करून ती विनंती मान्य केली. त्याच वेळी तो झाडावर बसून त्या हरिणांची वाट पाहत राहिला. या दरम्यान तो झाडांची पाने तोडून खाली टाकत होता. त्याठिकाणी शिवाची पिंड होती. ते बेलपत्र होते. व्याधाच्या हातून नकळतपणे बेलपत्र वाहिले गेले आणि हरिण देखील प्रामाणिकपणे परत आले. त्यावेळी भगवान शिव प्रकट होऊन त्यांना आकाशात स्थान दिले. तेच आकाशातील व्याध तारा आणि मृग नक्षत्र आहे, असे मानले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीला बेलपत्र शिवपिंडीवर अपर्ण करण्याला मोठे महत्त्व आहे.
बेलपत्राशिवाय 'ही' पाने देखील करतात शिवशंकराला अर्पण
महादेवाला बेलपत्र अर्पण करणे तर महत्त्वाचे आहेच मात्र याशिवाय अन्य काही पाने आणि फुले देखील भगवान शिवाला अर्पण केली जाातात. प्रदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पाने फुले अर्पण करण्याच्यी परंपरा आहे. यामध्ये विदर्भात बेलपत्रासह भांगाचे पान, धोत्र्याचे पान/फळ तसेच घोंगलाचे फूल वाहण्याची परंपरा आहे.
दक्षिण भारतात शंकराला निळी कमळे वाहण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मीची पाने, आघाडीची पाने, कदंबाची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, आवळीची पाने, अशोकाची पाने देखील शिवपूजनावेळी वाहिली जातात.