घरात मुळा असला की बहुतेक वेळा भाजीच बनते… आणि ती सर्वांना आवडेलच, असं नसतं. पण त्याच मुळ्यापासून जर खमंग आणि अगदी ढाबा-स्टाईल पराठा तयार झाला, तर? मग हा मुळा घरातला ‘अनवाँटेड’ न राहता सगळ्यांचा फेव्हरेट होईल. सकाळचा नाश्ता झटपट तयार करायचा असेल किंवा लंचबॉक्ससाठी काही पौष्टिक हवं असेल, तर मुळ्याचा पराठा एकदम परफेक्ट! चला तर मग, जाणून घेऊयायत ही खास रेसिपी..
गव्हाचे पीठ – 2 कप
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
तेल – 1 चमचा
किसलेला मुळा – 1 कप
बारीक चिरलेली कोथिंबीर – 2 चमचे
बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1
आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
लाल तिखट – ½ टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
गरम मसाला – ¼ टीस्पून
मीठ – चवीनुसार
थोडेसे तेल
मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाच्या पीठात मीठ आणि तेल घालून मऊसर कणिक भिजवून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावी. दुसऱ्या बाजूला मुळा किसून त्यात थोडंसं मीठ टाकून १० मिनिटांनी त्याचं पाणी निथळून घ्यावं, म्हणजे पराठा ओला होत नाही. निथळलेल्या मुळ्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून छान सारण तयार करा. आता भिजवलेल्या कणकेचे समान गोळे करून एक गोळा लाटून त्यावर सारण ठेवा आणि कडेनी कडेनी दुमडून पुन्हा हलक्या हाताने पराठ्यासारखा लाटून घ्या.
तवा गरम करून त्यावर थोडं तेल किंवा तूप घालून पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजा. गरमागरम मुळ्याचा पराठा दही, लोणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. मुळ्याचं निघालेलं पाणी फेकू नका; तेच वापरून कणिक भिजवल्यास पराठ्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात.