जिममध्ये मेहनत करणं आरोग्यासाठी चांगलं असलं, तरी काही व्यायाम शरीराला फायदा करण्याऐवजी थेट इजा पोहोचवतात. अमेरिकेतील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स सर्जन डॉ. डेव्हिड अब्बासी यांनी इंस्टाग्रामवर सांगितलं की अनेकजण 'हार्डकोर वर्कआउट'च्या नादात दीर्घकालीन सांधेदुखी, लिगामेंट इंजरी आणि पाठीच्या समस्यांना आमंत्रण देतात. त्यांनी ठामपणे पाच व्यायाम धोकादायक असल्याचे सांगत, हे त्वरित थांबवण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. अब्बासी यांच्या मते, 'बट-टु-ग्रेस' म्हणजे अतिशय खोल स्क्वॉट्सवर जड वजन घेणे हे गुडघे आणि कंबरेवर असह्य ताण आणते. यामुळे मेनिस्कस फाटणे, लिगामेंट तुटणे आणि डिस्क स्लिप होण्याचा धोका प्रचंड वाढतो. ते म्हणतात, “अशा स्क्वॉट्समुळे इजा होऊन माझ्याकडे येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.”
'बिहाइंड-द-नेक प्रेस' किंवा 'पुलडाऊन्स' हा व्यायाम खांद्याच्या रोटेटर कफवर थेट दबाव टाकतो. यामुळे खांद्याला इजा होणेआणि शरीराचे दीर्घकालीन दुखणे सहज उद्भवू शकते. डॉक्टरांचं मत स्पष्ट आहे की 'हा व्यायाम १००% टाळा.'
सिमेंट किंवा टाइल्सवर हाय-इम्पॅक्ट जम्प्स, बॉक्स जम्प्स करताना गुडघे आणि पायाच्या हाडांवर थेट धक्का बसतो. कार्टिलेज लवकर खराब होतं आणि सांधेदुखी वाढते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा पृष्ठभागावर जम्पिंग करणे म्हणजे 'गुडघ्यांचे स्वतःहून नुकसान करणे.'
क्रॉसफिटमध्ये लोकप्रिय असणारे 'किपिंग पुल-अप्स' खांदा आणि पाठीला अचानक झटके देतात. त्यामुळे रोटेटर कफ फाटणे, लॅब्रम इंजरी आणि पाठदुखी सारख्या समस्या उद्भवतात. डॉक्टर म्हणतात, 'हा व्यायाम म्हणजे खांदा-पाठ दुखण्याची हमी.'
क्लीन-अँड-जर्क किंवा स्नॅच सारख्या ऑलिम्पिक लिफ्ट्स चुकीच्या फॉर्मने केल्यास कंबर, गुडघे आणि खांदे तीव्र इजेला सामोरे जातात. डॉ. अब्बासी यांच्या म्हणण्यानुसार, “चुकीचा फॉर्म घेऊन हे लिफ्ट्स करणारे लोक दर आठवड्याला माझ्याकडे येतात.”
डॉ. अब्बासी व्यायाम करणाऱ्यांना सांगतात की प्रत्येक वर्कआउट योग्य फॉर्मने करा आणि ‘इगो लिफ्टिंग’ टाळा. जड वजन घ्यायचं असेल तर स्क्वॉट कमी करा. खांद्याच्या मागे काहीही दाबू नका. जम्प करताना नेहमी रबर मॅट किंवा गवतासारख्या सुरक्षित पृष्ठभागाचा वापर करा. पुल-अप्स करताना शक्य तितक्या नियंत्रित हालचाली ठेवा आणि शरीर हलवू नका.
“तुमचे सांधे आयुष्यभर टिकले पाहिजेत. जिममध्ये १० मिनिटं भारी दिसण्यासाठी १० वर्षं वेदना सहन करून उपयोग नाही, असे डॉ. अब्बासी सांगतात.
त्यांच्या मते, या पाच व्यायामांपासून दूर राहिलात तर गुडघे आणि खांदे तुमचे आयुष्यभर आभार मानतील.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)