हिंदू धर्मात असं मानलं जातं की, पारिजातकाचं झाड स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले आहे. पौराणिक कथेनुसार, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यात या पारिजातकाच्या फुलावरून वाद झाले होते. त्यामुळे अखेर हे झाड भगवान श्रीकृष्णाला स्वर्गातून आणावे लागले. पारिजातकाचं फूल हे दिसायला अतिशय सुंदर असते. याचा पांढरा आणि केशरी रंग मनमोहून घेतो. याचा गजरा देखील केसांमध्ये खूप सूंदर दिसतो. मात्र, तुम्हाला माहित आहे या पारिजातकाच्या फुलाचे आणि झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. जाणून घ्या काही महत्त्वाचे आरोग्यदायी फायदे.
आरोग्यदायी चहा
पारिजातकचे फूल तसेच पानांपासून चहा तयार केला जातो. हा चहा, चविष्टच नव्हेतर आरोग्यास देखील फायदेशीर आहे. आपण हा चहा वेग वेगळ्या पद्धतीने देखील बनवू शकता आणि आरोग्य आणि सौदयार्च अनेक फायदे मिळवू शकता. हा चहा बिना दुधाचा तयार केला जातो. हा चहा खोकला घालवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच यामुळे उत्साह वाढतो.
सांधे दुखी
पारिजातकाची ६-७ पाने सांधे दुखीवर उपयुक्त आहेत. या पानांची पेस्ट करून ती पाण्यात उकळून घ्यावी. नंतर थंड करून सकाळी अनोश्या पोटी घ्यावी. याचे नियमित सेवन केल्यानं सांधे दुखी हळूहळू नाहिशी होते.
ताप
पारिजातकात तापाचा नायनाट करण्याची क्षमता असते. कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास पारिजातकाचा चहा प्यावा. लगेचच आराम मिळतो.
सायटिका
सायटिका हा असा आजार आहे जो लवकर बरा होत नाही. त्यावर पारिजातकाची पाने हे उत्तम औषध सिद्ध होऊ शकते. सायटिका असल्यास दोन कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे 8 ते 10 पानं मंद आचेवर अर्थ होईपर्यंत उकळावे, थंड करून प्यावं. यामुळे साधारण आठवडाभरात फरक पडेल.
मूळव्याध
पारिजातकाचे केवळ फूल आणि पानेच नाही तर त्याच्या बिया देखील औषधी असतात. मूळव्याधासाठी या अत्यंत उपयुक्त असतात. पारिजातकाच्या बियांची पेस्ट बनवून मूळव्याधाच्या जागी लावल्यास खूप फायदा होतो.
त्वचेसाठी
पारिजातकाचे फूल आणि पानांची पेस्ट तयार करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार होतो.
हदय रोग
पारिजातकाचा वापर हृदयाच्या आजारामध्ये फायदेशीर ठरतं. याच्या 15 ते 20 फुलांच्या रसाचे सेवन केल्याने हृदयाच्या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकता.
दमा
पारिजातकाची सालीची भुकटी बनवून नागवेलीच्या पानांत टाकून सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने दमा आणि अन्य श्वसनविकारात त्याचा फायदा होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पारिजातकाच्या पानांचा रस किंवा याचा चहा बनवून नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य उत्तम राहते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)