

समोसे, भजी, वडापाव किंवा इतर गरम पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून देण्याची पद्धत अजूनही अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिला आहे. वर्तमानपत्रातील शाई आणि रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
वर्तमानपत्रात अन्न पॅकिंगवर FSSAI ची कारवाई
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) पश्चिम विभागाने सर्व खाद्य व्यवसायिकांना अन्नपदार्थ पॅक करणे, गुंडाळणे किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये प्राधिकरणाने म्हटले आहे की, वर्तमानपत्रांमध्ये वापरली जाणारी छपाईची शाई आणि रासायनिक घटक अन्न दूषित करू शकतात आणि ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात.
हॉटेल्स आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांना सूचना
हॉटेल्स, रस्त्यावरील खाद्यविक्रेते, फूड स्टॉल्स आणि इतर खाद्य व्यवसायांनी केवळ फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्याचाच वापर करावा, असे आवाहन FSSAI ने केले आहे.
प्राधिकरणाने स्पष्ट केले की, वर्तमानपत्रे फूड-ग्रेड सामग्री नसल्याने त्यांचा अन्नाशी थेट संपर्क होणे धोकादायक आहे.
शाईतील रसायनांचा आरोग्यावर परिणाम
FSSAI च्या माहितीनुसार, वर्तमानपत्रांच्या शाईमध्ये शिसे (लेड) आणि इतर जड धातूंसारखे घातक पदार्थ असू शकतात. गरम, तेलकट किंवा ओलसर अन्नपदार्थांमध्ये हे रसायन सहज मिसळू शकतात.
या विषारी घटकांमुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तसेच, वर्तमानपत्रे अनेकदा अस्वच्छ परिस्थितीत हाताळली जात असल्याने अन्नजन्य आजारांचा धोकाही वाढतो.
मुंबईतील घटनेनंतर पुन्हा इशारा
मुंबईतील एका वडापाव विक्रेत्याकडून अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर केला जात असल्याचे समोर आल्यानंतर FSSAI आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी संयुक्त कारवाई केली होती. यानंतर FSSAI ने पुन्हा एकदा विक्रेते आणि ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ग्राहकांनाही महत्त्वाचा सल्ला
FSSAI ने ग्राहकांनाही वर्तमानपत्रात पॅक किंवा वाढलेले अन्नपदार्थ खरेदी करण्याचे टाळावे, असा सल्ला दिला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणारे सुरक्षित आणि फूड-ग्रेड पॅकेजिंगच वापरणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.