संध्याकाळ होताच काहीतरी चटपटीत, गरमागरम आणि चवीने भरलेले खाण्याची इच्छा हमखास होते. अशा वेळी रस्त्यावरील रगडा चाटची आठवण येतेच; मात्र बाहेरचं खाताना स्वच्छता आणि आरोग्याबाबत शंका मनात डोकावतात. मग प्रश्न पडतो, स्ट्रीट स्टाईल चव आणि घरगुती स्वच्छता दोन्ही एकत्र कसं मिळेल? यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कुकरमध्ये फक्त २० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रगडा चाट रेसिपी. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि रस्त्यावरील चाटसारखीच चव असलेली ही रेसिपी संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट ठरणार आहे.
साहित्य:
पांढरे वाटाणे - ३/४ कप
उकडलेले बटाटे - २
टोमॅटो - १
हळद पावडर - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
चिंच चटणी - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
चाट मसाला - १ चमचा
कुटलेली लाल मिरची - १ चमचा
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कांदा - १
हिरव्या मिरच्या - २
शेव - सर्व्हसाठी
कृती:
सुरुवातीला वाटाणे स्वच्छ धुवून ७–८ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये भिजवलेले वाटाणे, बटाटे, टोमॅटो, हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ३ शिट्ट्या मारून शिजवा. कुकर थंड झाल्यानंतर टोमॅटो व बटाटे काढा आणि बटाटे चमच्याने किसून वाटाण्यात मिसळा. त्यानंतर जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला, कुटलेली लाल मिरची आणि कोथिंबीर घालून नीट ढवळा. तयार रगडा एका बाऊलमध्ये काढून त्यावर हिरवी चटणी, चिंच चटणी, टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि शेव घालून लगेच सर्व्ह करा.
टिप्स:
वाटाणे आधी भिजवले की झटपट शिजतात.
बटाटे किसताना हळूहळू मिसळा, रगडा खमंग बनतो.
हवे असल्यास थोडा दही घालून थोडासा क्रीमी स्वाद मिळवता येतो.
चव अधिक टोकाची हवी असल्यास थोडा लाल मिरची पावडर किंवा तिखट वाढवू शकता.