आरोग्यदायी खाण्याच्या नादात अनेक जण कच्च्या भाज्या, स्मूदी आणि स्प्राऊट्सवर भर देत आहेत. ‘हेल्दी’ म्हणून ह्या पदार्थांचा रोजच्या जेवणात आवर्जून समावेश केला जातो. पण जे दिसतं ते नेहमीच आरोग्यासाठी चांगलं असेलच असं नाही. याचाच उलगडा करत न्यूट्रिशनिस्ट शालिनी सुधाकर यांनी काही कच्च्या पदार्थांबद्दल महत्त्वाचा आणि थेट इशारा दिला आहे.
स्प्राऊट्स: हेल्दी पण धोकादायक!
शालिनी यांच्या मते स्प्राऊट्स ज्या उबदार आणि दमट वातावरणात उगवतात, तेच वातावरण E.coli आणि सॅल्मोनेला सारख्या हानिकारक जंतुंसाठी उत्तम ठरते.
कच्चे स्प्राऊट्स खाल्ल्यास हे जंतू पोट बिघडवणे, इन्फेक्शन होणे, यांसारखे त्रास देऊ शकतात. म्हणूनच त्यांनी स्प्राऊट्स वाफवून (steamed) खाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे जंतू नष्ट होतात आणि पचनही नीट होतं, असं शालिनी सांगतात.
कच्च्या पालेभाज्यांचे ‘स्मूदी’/ सॅलड टाळा
अनेकांना हिरव्या पालेभाज्यांच्या स्मूदीज, सॅलड म्हणजे प्रचंड हेल्दी वाटतात… पण न्यूट्रिशनिस्ट शालिनींच्या मते हा प्रकार शरीरासाठी उलट त्रासदायक ठरू शकतो.
पालकासारख्या पालेभाज्यांमध्ये ऑक्सलेट मोठ्या प्रमाणात असतं.
हे घटक आपल्या पोटाला पचवणं अवघड जातं.
शरीरातील कॅल्शियमशी ते जोडून किडनी स्टोन तयार करण्याचा धोका वाढतो.
म्हणूनच त्यांनी स्मूदी किंवा सॅलडमध्ये कच्चा पालक टाकू नये, असा इशारा दिला आहे तर, पालेभाज्या नेहमी पूर्णपणे शिजवून खाव्यात असा सल्लाही दिला.
रिकाम्या पोटी चहा-कॉफी: सर्वात मोठी चूक
अनेकांचा दिवस कडक चहा किंवा कॉफीनेच सुरू होतो. पण शालिनी सांगतात- रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्याने अॅसिड रिफ्लक्स, जळजळ आणि गॅसची समस्या वाढते. हळूहळू आतड्यांवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
म्हणूनच शालिनी यांनी, 'सकाळी उठल्यावर प्रथम पाणी किंवा हलका आहार घ्या; नंतर चहा किंवा कॉफी घ्या' असा सल्ला दिला आहे.
गट हेल्थ का जपणं गरजेचं?
गट (आतडे + पचनसंस्था) हे एकूण आरोग्याचं मूळ आहे.
पचन सुधारतं
मेटाबॉलिझम चांगला राहतो
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मानसिक ताणतणाव नियंत्रित राहतो
अस्वस्थ गटमुळे IBS, गॅस, थकवा आणि अगदी मूड स्विंग्सही निर्माण होऊ शकतात.
काही पदार्थ ‘हेल्दी’ म्हणून लोकप्रिय असतील, पण ते प्रत्येकासाठी योग्यच असतात असं नाही.
न्यूट्रिशनिस्ट शालिनी सुधाकर यांनी दिलेला हा साधा पण महत्त्वाचा सल्ला-
स्प्राऊट्स शिजवून खा
पालेभाज्या कच्च्या टाळा
रिकाम्या पोटी चहा-कॉफी नको
तुमचं पोट (गट हेल्थ) नीट असेल तर शरीरही निरोगी, ऊर्जावान आणि संतुलित राहतं!
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)