कैरीचा सीझन सुरू! घरच्या घरी बनवा आंबट-गोड 'आमपापड'; स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय 
लाईफस्टाईल

कैरीचा सीझन सुरू! घरच्या घरी बनवा आंबट-गोड 'आमपापड'; स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

कच्च्या कैरीपासून घरच्या घरी आंबट-गोड आमपापड कसा बनवायचा ते जाणून घ्या. सोपी रेसिपी, कमी साहित्य आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट हेल्दी स्नॅक एकदा बनवा आणि दीर्घकाळ साठवून ठेवा.

Mayuri Gawade

उन्हाळा आला की कैऱ्यांचा सुगंध दरवळू लागतो. लोणचं, पन्हं यांसोबतच कैरीपासून बनणारा एक पारंपरिक आणि तितकाच चविष्ट पदार्थ म्हणजे आमपापड. आंबट-गोड चवीचा हा पापड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. विशेष म्हणजे घरच्या घरी बनवलेला आमपापड शुद्ध आणि रसायनमुक्त असल्यामुळे तो अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरतो.

आमपापड का ठरतो खास?
कैरीचा नैसर्गिक आंबटपणा आणि साखरेची गोडी यांचा परफेक्ट समतोल आमपापडात मिळतो. उन्हाळ्यात शरीराला थोडासा गारवा देण्यासही तो मदत करतो. शिवाय, एकदा बनवून ठेवल्यावर हा पदार्थ दीर्घकाळ साठवून ठेवता येतो, त्यामुळे ऑफिस किंवा प्रवासासाठीही हा उत्तम स्नॅक ठरतो.

साहित्य:

  • २-३ कच्च्या कैऱ्या

  • १ कप साखर (चवीनुसार)

  • चिमूटभर मीठ

  • १/२ टीस्पून वेलची पूड (ऐच्छिक)

  • थोडे तूप (ताटाला लावण्यासाठी)

कृती:
सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून त्यांची साल काढा आणि गर वेगळा करा. हा गर मिक्सरमध्ये घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट कढईत घेऊन त्यात साखर आणि मीठ घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालून नीट मिसळा आणि गॅस बंद करा. आता तूप लावलेल्या प्लास्टिक शीट किंवा ताटावर हे मिश्रण पातळ थरात पसरवा. हे मिश्रण उन्हात २-३ दिवस वाळवून घ्या. पूर्णपणे कोरडे झाल्यावर आमपापड तयार होतो.

साठवण आणि सर्व्हिंग टिप्स:

  • तयार आमपापड एअरटाइट डब्यात साठवून ठेवा

  • स्नॅक म्हणून किंवा डब्यात सोबत नेण्यासाठी उत्तम पर्याय

  • पाहुण्यांना सर्व्ह केल्यास नक्कीच पसंती मिळते

उन्हाळ्यात कैरीचा हंगाम असताना एकदा तरी हा पारंपरिक आमपापड घरच्या घरी बनवून पाहा आणि आंबट-गोड चवीचा खास आनंद घ्या.

दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये, पुण्यात भारत मंडपम... मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ मोठे निर्णय

भारत सोडावा लागणार? अभिनेता इम्रान खानच्या याचिकेवर आता २ नोव्हेंबरला सुनावणी

सोशल मीडियावर २ मिलियन फॉलोअर्स, पण निवडणुकीत मिळाली अवघी ३३ मतं; निकाल पाहून ज्योतिषाला धक्का

मुंबई महापालिकेच्या निवृत्त अभियंत्यांच्या पेन्शनला कात्री; अनधिकृत बांधकाम प्रकरण भोवले

बदनामी करणाऱ्या शिपायाला दणका; पुनर्नियुक्ती करण्याचा न्यायाधिकरणाचा आदेश रद्द