रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या बंधनातील गोडवा आणि त्यांच्या नात्यातील प्रेमाचा गोड सण. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि गोडधोड खाऊ घालतात. घरात उत्साहाचं वातावरण असतं आणि काहीतरी खास मिठाई बनवण्याची सगळ्यांना ओढ लागलेली असते. अशा वेळी वेळही वाचावा आणि चवही भारी असावी असं वाटत असेल, तर सफरचंदाची खीर ही रेसिपी खास तुमच्यासाठी!
साहित्य:
सफरचंद (किसलेले) – २ मध्यम आकाराचे
दूध – १ लिटर
कंडेन्स्ड मिल्क – १/४ कप
तूप – १ चमचा
वेलची पावडर – १/२ चमचा
सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता) – आवडीनुसार, बारीक चिरलेले
कृती:
सफरचंदाची खीर करताना सर्वप्रथम सफरचंद सोलून किसून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात हे किसलेले सफरचंद ५-७ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या. सफरचंद थोडं मऊसर झालं की गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. तर दुसऱ्या गॅसवर दूध गरम करत ठेवा. एक उकळी आल्यावर त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला आणि १० मिनिटं मध्यम आचेवर सतत हलवत दूध किंचित आटवा. दूध थंड झाल्यावर त्यात भाजलेले सफरचंद आणि वेलची पावडर घाला. सर्व घटक चांगले मिसळा. ही खीर आता फ्रीजमध्ये ३०-४० मिनिटांसाठी ठेवा. थंड झालेली खीर बाहेर काढा आणि वरून काजू-बदाम-पिस्त्याने सजवा. ही खीर थंडगारच सर्व्ह करा. तिचा गोडवा, सफरचंदाचा फ्रेशनेस आणि मेव्याचा स्वाद सगळ्यांच्या मनात भरून राहील!
या रक्षाबंधनाला बहिणीच्या हातचं हे गोडसर सरप्राईज भावासाठी खास ठरू शकतं. सफरचंदाची ही हटके खीर नक्की करून पाहा!