Stainless Steel Sink Cleaning : सिंकवरील डाग घालवण्यासाठी महागडे क्लिनर नको; किचनमधील 'ही' ट्रिक ठरेल फायदेशीर  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Stainless Steel Sink Cleaning : सिंकवरील डाग घालवण्यासाठी महागडे क्लिनर नको; किचनमधील 'ही' ट्रिक ठरेल फायदेशीर

सिंकवर डाग साचू नयेत यासाठी नियमित स्वच्छता करणे आणि प्रत्येक वापरानंतर तो कोरडा पुसणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

किशोरी घायवट-उबाळे

स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ ठेवण्यासाठी अनेकजण दररोज मेहनत घेतात. मात्र, स्टेनलेस स्टीलचा सिंक कितीही घासून स्वच्छ केला तरी त्यावर पाण्याचे डाग, साबणाचे अवशेष आणि पांढरे थर दिसतात. विशेषतः सिंक वाळल्यानंतर त्यावर पुन्हा डाग दिसू लागतात. त्यामुळे स्वच्छ केलेला सिंकही अस्वच्छ असल्यासारखा वाटतो. अशावेळी महागड्या क्लिनिंग प्रोडक्ट्सचा वापर करण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या बेकिंग सोड्याच्या मदतीने सिंकवरील हट्टी डाग दूर करून त्याला पुन्हा चमकदार बनवता येऊ शकते. ही स्वच्छतेची पद्धत नेमकी कशी वापरायची? जाणून घेऊया.

सिंक स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा

सर्वप्रथम सिंकच्या आतील बाजूस आणि तळाशी गरम पाणी टाका. यामुळे सिंकवर साचलेले अन्नाचे कण, धूळ आणि इतर मळ सैल होण्यास मदत होते. नळाच्या स्वच्छतेसाठी ओल्या कापडाचा वापर करा. गरम पाण्यामुळे पुढील स्वच्छता करणेही सोपे होते.

बेकिंग सोड्याने हट्टी डाग होतील दूर

सिंक ओले असतानाच त्यावर सर्व बाजूंनी बेकिंग सोडा शिंपडा. बेकिंग सोडा हा सौम्य स्क्रबर म्हणून काम करतो. त्यामुळे सिंकला चिकटलेले अन्नाचे कण आणि तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. तसेच सिंकमधून येणारा दुर्गंध कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

सिंक घासताना 'ही' काळजी घ्या

बेकिंग सोडा टाकल्यानंतर मऊ ब्रश किंवा न खरवडणाऱ्या स्पंजने सिंक स्वच्छ करा. मात्र, स्टेनलेस स्टीलचा सिंक घासताना त्यावरील बारीक रेषांच्या दिशेनेच घासणे महत्त्वाचे आहे. विरुद्ध दिशेने घासल्यास पृष्ठभागावर ओरखडे पडू शकतात. नळाच्या आसपासची जागा आणि सिंकच्या ड्रेनजवळील भाग स्वच्छ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करता येईल. स्टीलचा स्क्रबर किंवा वायर ब्रश वापरणे टाळा.

व्हिनेगरने दूर होतील पाण्याचे डाग

सिंक घासून झाल्यानंतर त्यावर डिस्टिल्ड व्हाइट व्हिनेगरची फवारणी करा. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांच्या प्रक्रियेमुळे सिंकवरील खनिजांचे थर सैल होण्यास मदत होते. फसफसणे थांबल्यानंतर सिंक कोमट पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्या.

सिंक धुतल्यानंतर लगेच कोरडे करा

सिंक स्वच्छ केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे कोरडा करणे. यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करा. सिंक आणि नळावर पाण्याचे थेंब राहिल्यास पुन्हा पाण्याचे डाग तयार होऊ शकतात. त्यामुळे धुतल्यानंतर लगेच पुसून घेणे आवश्यक आहे.

हट्टी डागांसाठी वापरा 'ही' ट्रिक

सिंकवर गंजाचे डाग, रंग बदललेले भाग किंवा पाण्यामुळे तयार झालेले हट्टी थर असतील तर त्यासाठी वेगळा उपाय करता येतो. यासाठी एक चतुर्थांश कप क्रीम ऑफ टार्टर आणि एक कप डिस्टिल्ड व्हाइट व्हिनेगर एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग असलेल्या भागावर लावा. साधारण पाच मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर मऊ स्पंजने हलक्या हाताने घासून पाण्याने स्वच्छ धुवा.

सिंकला मिळेल नव्यासारखी चमक

सिंक पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा झाल्यानंतर मायक्रोफायबर कापडावर ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घ्या. या कापडाने सिंक आणि नळ हलक्या हाताने पुसून घ्या. यामुळे स्टीलचा पृष्ठभाग अधिक चमकदार दिसण्यास मदत होते.

अशा प्रकारे घरातील बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीने स्टेनलेस स्टीलचा सिंक स्वच्छ ठेवता येतो. मात्र, सिंकवर डाग साचू नयेत यासाठी नियमित स्वच्छता करणे आणि प्रत्येक वापरानंतर तो कोरडा पुसणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी

नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल