दररोजच्या जेवणात तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. शिमला मिरचीची भाजी अनेक घरांमध्ये बनवली जाते. मात्र, अख्ख्या शिमला मिरचीत बटाटा, ताजं खोबरं आणि शेंगदाण्याच्या कुटाचं मसालेदार सारण भरून तयार केलेली भाजी जेवणाची चव वाढवू शकते. भाकरी, चपाती किंवा पुरीसोबत ही भाजी छान लागते. विशेष म्हणजे, घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून ती तयार करता येते. चला, जाणून घेऊया भरलेली शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.
भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी साहित्य
४ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या
२ उकडलेले बटाटे
१ मध्यम आकाराचा कांदा
१ टोमॅटो
५ ते ६ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे शेंगदाण्याचं कूट
२ चमचे ताजं खोबरं
अर्धा चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
तेल आवश्यकतेनुसार
भरलेली शिमला मिरची बनवण्याची कृती
१. सर्वप्रथम सारण तयार करा
लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट तयार करा. उकडलेले बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्या. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून बाजूला ठेवा.
२. मसाला खमंग परतून घ्या
कढईत थोडं तेल गरम करून त्यात लसूण-मिरचीची पेस्ट घाला. त्यानंतर चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता त्यात ताजं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, हळद आणि मीठ घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून मसाला खमंग होईपर्यंत परता. त्यात कुस्करलेला बटाटा घालून मिश्रण एकजीव करा. सारण तयार झाल्यावर ते थोडं थंड होऊ द्या.
३. शिमला मिरचीत सारण भरा
शिमला मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या करा. प्रत्येक मिरचीच्या देठाजवळ गोलाकार काप देऊन वरचा भाग अलगद काढा. आतील बिया काढून मिरचीच्या पोकळ भागात तयार केलेलं सारण भरा. वरचा काप झाकणाप्रमाणे ठेवू शकता.
४. मंद आचेवर शिजवून घ्या
कढईत थोडं तेल गरम करा. उरलेला कांदा आणि टोमॅटो परतून त्यात थोडे मसाले घाला. आता सारण भरलेल्या शिमला मिरच्या कढईत ठेवा. झाकण लावून मंद आचेवर शिजू द्या. मध्येच मिरच्या हलक्या हाताने फिरवा, म्हणजे त्या सर्व बाजूंनी शिजतील. शिमला मिरची मऊ होऊन मसाल्याला छान रंग आला की गॅस बंद करा.
गरमागरम भरलेली शिमला मिरची सर्व्ह करा
तयार झालेली भरलेली शिमला मिरची भाकरी, चपाती किंवा पुरीसोबत सर्व्ह करा. बटाटा, खोबरं आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे सारणाला छान चव येते. घरच्या घरी कमी साहित्यात तयार होणारी ही भाजी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.