लाईफस्टाईल

असे स्वीकारा अपयश

जीवनात प्रत्येकाला अपयश येते. यश हुलकावणी देते. हा सामान्य नियम आहे. मात्र अपयशाला तुम्ही कसे तोंड देता, अपयशातून स्वविकास कसा साधता, स्वत:चा भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवता, का अपयशातच मग्न राहता यावरून प्रत्येकाचे वेगळेपण ठरते.

नवशक्ती Web Desk

- हितगुज

- डॉ. शुभांगी पारकर

जीवनात प्रत्येकाला अपयश येते. यश हुलकावणी देते. हा सामान्य नियम आहे. मात्र अपयशाला तुम्ही कसे तोंड देता, अपयशातून स्वविकास कसा साधता, स्वत:चा भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवता, का अपयशातच मग्न राहता यावरून प्रत्येकाचे वेगळेपण ठरते.

यश कधीही तुमच्या डोक्यात शिरू देऊ नका; अपयश कधीही तुमच्या हृदयात येऊ देऊ नका.’ हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. अपयश आल्यानंतर ज्यांना निराश वाटते त्यांनी ते लक्षात घेणे आवश्यक आहे. यशस्वी होणे म्हणजे आनंद, जल्लोष. हे इतक्या सहज घडते की बऱ्याचदा ते आपल्या लक्षात येत नाही. मात्र एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेनुसार झाली नाही किंवा तिने अपेक्षित गुणवत्ता गाठली नाही की, अपयशाची भावना निर्माण होते. अपयश हे एकाच वेळी वैयक्तिक असते आणि पूर्णपणे सामाजिकही असते. व्यक्तिगत पातळीवर आपण काहीतरी साध्य करण्यात अयशस्वी होतो आणि घायाळ झालेल्या अहंकाराचा त्रास सहन करतो. मात्र व्यक्तिगत अपयशाला सामाजिक पार्श्वभूमी असते. आपली सामाजिक व्याप्ती, सामाजिक क्षेत्रातील आपले स्थान अशा अनेक घटकांवर यश-अपयश अवलंबून असते.

यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या जीवनाच्या यिन आणि यांग आहेत. प्रत्येकालाच अडचणी आणि अपयशांना तोंड द्यावे लागते. परंतु यशाला सामोरे जाण्यासाठी मात्र लोक तयार नसतात.

यशाची काळी बाजू

जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा प्रशंसा आणि बक्षिसांचा ओघ आपल्या अहंकाराला फुगवू शकतो, आपल्याला अजिंक्य वाटू शकते. तथापि, अजिंक्यतेची भावना ही दुधारी तलवार असू शकते. जर तिचे योग्यरीत्या व्यवस्थापन केले नाही तर ती यश, आत्मसंतुष्टता, अहंकार आणि सहानुभूतीचा अभाव निर्माण करू शकते.

बराक ओबामा यांनी यशाबद्दल एक अर्थपूर्ण भाष्य केले आहे. ते म्हणतात, तुम्ही अपयशी होता का नाही, यात खरी परीक्षा नाही. पण हे अपयश तुमच्या मनावर हावी होते तेव्हा तुम्ही स्वतःला कठोर होऊ देता का, ते तुम्हाला निष्क्रियतेसाठी उद्युक्त करते का किंवा तुम्ही त्यातून काही शिकता की नाही, भविष्यात चिकाटीने प्रयत्न करता की नाही, या प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची आहेत.

जगात जर कोणाकडे यश आणि अपयशावर बोलण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी अंतर्दृष्टी असेल तर ते नेल्सन मंडेला आहेत. त्यांनी अनुभवले होते की, यशाचा आणि मुख्यत्वेकरून स्वातंत्र्याचा मार्ग अडचणींनी भरलेला आहे. तथापि, त्यांनी दृढनिश्चयाने त्यांच्या सभोवतालच्या जगात आश्चर्यकारक बदल घडवून आणले. हे खऱ्या अर्थाने यश आहे.

दुर्दैवाने, बरेच लोक एखादे मोठे अपयश आल्यानंतर प्रयत्न करायचे थांबवतात. ते त्यांचा आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि इच्छाशक्ती गमावतात. तथापि, मोठे यश अपयशाच्या नंतरच मिळते. कारण यशासाठी प्रयत्न करतानाच अयशस्वी होऊ नये यासाठी काय करू नये, हे अपरिहार्यपणे शिकले जाते.

यश मिळाल्यानंतर अनेक व्यक्ती त्यांच्या मुळांपासून वेगळ्या होतात, आयुष्यात खरोखर काय महत्त्वाचे आहे हे विसरतात. आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याच्या दबावामुळे त्यांना चिंता, ताण आणि बर्नआऊट या समस्यांना तोंड द्यावे लागते. आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जगात, जोपर्यंत अपयश येत नाही तोपर्यंत कोणालाही खरे, चिरस्थायी यश मिळत नाही. तुम्ही ज्या ध्येयासाठी प्रयत्न करत आहात ते साध्य करण्यासाठी वाटेत येणारे अपयश तुम्हाला बऱ्याच व्यवहार्य गोष्टी शिकवत असते.

चालत रहा

अपयश आल्यानंतर अनेकांचा धीर सुटतो. त्यांना अपयश म्हणजे आपण थांबावे यासाठीची सूचना वाटते किंवा चालायचे ठरवले तर तो खूप लांबचा पल्ला आहे, असे वाटते. इथेच चिकाटीची गरज असते.

यशाचा आनंद साजरा करणे प्रत्येकालाच आवडते. परंतु अपयशाचे धडे शिकल्याने आपली जी सर्वसमावेशक वाढ होते ती आपल्याला आणखी मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकते. लहान मूल चालायला शिकताना अनेकवेळा खाली पडते. तरी ते पुन्हा उठून उभे राहते. असे वारंवार घडते. यातूनच मूल कधीतरी सहजतेने चालू लागते. धावूही लागते. थोडक्यात लहान मुले दृढनिश्चयी असतात. या मुलांचे प्रत्येक पडणे त्यांना संतुलन, लवचिकता आणि चालण्याचे तंत्र शिकवते. आधीच्या त्या पडण्याशिवाय नंतरचे चालणे शक्य झाले नसते.

कोरोना साथीच्या महामारीत जगाला मोठ्या प्रमाणात सामूहिक अपयशाचा अनुभव आला. व्यवसाय बंद पडले, करिअर डबघाईला आले आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली. लोकांना त्यांच्या अंतर्गत संघर्षांना पूर्वी कधीही न अनुभवलेल्या पद्धतीने तोंड द्यावे लागले. ही जागतिक घटना म्हणजे अपयशाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. या काळात स्पष्ट झाले की, पूर्वीपेक्षा जास्त लोकांना त्यांच्या अपयशातून मार्ग काढण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी अधिक साधनांची आवश्यकता आहे.

अपयश हाच सोबती

पौर्णिमेच्या रात्री चालण्याची मजा केवळ निस्तेज रात्रीच्या अंधारानंतर येते. जीवनात यश मिळविण्यासाठी कोणताही क्रॅश कोर्स नाही. अपयशाच्या काळातले रडणे एखाद्या व्यक्तीला नंतर यशाचा आनंद घेण्याची शक्ती देते. आयुष्यात एकदाही अपयशी न ठरलेल्या आणि यशस्वी झालेल्या व्यक्तीचे एकही उदाहरण आज जगात नाही. उत्कृष्टता, परिपूर्णता आणि यश मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नात अपयश हे सावलीसारखे सोबत असते. स्पर्धात्मक पाश्चात्य समाजात अपयशाला मानवी प्रवासाचा अविभाज्य भाग म्हणून पाहण्याऐवजी यशाचे विरुद्ध टोक म्हणून पाहिले जाते. मात्र आपण आपली दृष्टी विशाल केली आणि आपल्या अनुभवांचे सिंहावलोकन केले तर आपण अपयशाकडे वाढीचा एक नैसर्गिक आणि आवश्यक पैलू म्हणून पाहू शकतो. अपयशामुळे येणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या अनुभवांपैकी एक म्हणजे लवचिकता वाढवण्याची क्षमता विकसित होते. अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहणारे लोक मानसिकदृष्ट्या अधिक कणखर होतात. चिकाटी या गुणाचा विकास साधतात. विज्ञानापासून ते उद्योजकतेपर्यंतच्या विविध क्षेत्रात वारंवार अपयश आल्यानंतरच अभूतपूर्व शोधांच्या संधी येतात, हे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, थॉमस एडिसन यांनी लाइट बल्बचा शोध लावण्यापूर्वी हजारो अयशस्वी प्रयोग केले. त्यांनी म्हटले आहे की, “मी अपयशी नक्कीच ठरलो नाही. प्रयोगांमधून मला असे १०,००० मार्ग सापडले ज्यामुळे मला कळले आहे की, बल्ब बनवण्यासाठी ते काही कामाचे नाहीत.” थोडक्यात, अपयशाची साथ देत एडिसनसारखे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चिकाटी आणि अपयशाची नवी व्याख्या करत यशाची वाट अधिक व्यापक करतात.

अपयश नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देते. जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी ठरते तेव्हा ती आपल्या आधीच्या पद्धतींचा पुनर्विचार करत पर्यायी उपायांचा शोध घेते. वेगवेगळ्या कोनातून समस्येकडे पाहते. व्यवसाय आणि तंत्रज्ञानासारख्या गतिमान वातावरणात, जिथे सतत बदल घडत असतात, तिथे पर्यायी विचार करणे महत्त्वाचे ठरते. स्टीव्ह जॉब्ससारख्या अनेक यशस्वी उद्योजकांना मोठे यश मिळवण्यापूर्वी अडचणींचा मोठा सामना करावा लागला. जॉब्सना ते ज्या कंपनीचे सह-स्थापक होते त्या ॲपल कंपनीमधून काढून टाकण्यात आले होते. पण हार न मानता ते जेव्हा पुन्हा नवीन दृष्टिकोनासह कंपनीत परतले तेव्हा त्यांनी त्या कंपनीला जगातील एक अग्रेसर कंपनी केले. त्यांचे तेव्हाचे अपयश ही त्यांच्या जीवनातील अंतिम पायरी नव्हती, तर ती मोठ्या यशासाठी त्यांनी घेतलेली झेप होती.

अपयशाचे आणखी काही महत्त्वाचे पैलू आहेत. चारित्र्य आणि भावनिक बुद्धिमत्ता घडवण्यात अपयश महत्त्वाची भूमिका बजावते. ते नम्रता, संयम आणि प्रयत्नांचे महत्त्व शिकवते. जे अपयश अनुभवतात आणि त्यातून शिकतात त्यांच्यात इतरांविषयी सहानुभूती निर्माण होते. तसेच इतरांच्या संघर्षाची सखोल समज विकसित होते. ही भावनिक वाढ महत्त्वाची असते. विशेषतः नेतृत्वस्थानी असलेल्या व्यक्तींच्या भूमिकांमध्ये ती महत्त्वाची ठरते. त्यातूनच लवचिकता आणि अडचणींना तोंड देण्याची क्षमता वाढून दीर्घकालीन यश मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच अपयशाच्या दरम्यान आवश्यक आहे ती विचारांची तल्लखता. उदाहरणार्थ, मी यातून काय शिकलो? मला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि मी त्यावर कशी मात केली? भविष्यात अशीच परिस्थिती आली तर मी वेगळ्या पद्धतीने कोणती कृती करेन?

शेवटी, अपयश हा केवळ एक अडथळा नसून यशासाठी आवश्यक असणारी पूर्वअट आहे. अपयशाची भीती बाळगण्याऐवजी यशाच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाचा एक नैसर्गिक आणि मौल्यवान भाग म्हणून ते स्वीकारले पाहिजे. जर तुम्ही अपयशातून काहीच शिकला नाहीत, तर अपयश हे फक्त अपयशच ठरते. परीक्षेत वाईट गुण मिळाल्यानंतर पुढच्या वेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता. नात्यात कटुता आली तर पुढच्या वेळी निरोगी नाते कसे निर्माण करायचे हे तुम्हाला समजते. यशाची गुरुकिल्ली अपयश टाळण्यात नाही, तर त्या अपयशातून शिकणे, रणनीती सुधारणे आणि अडचणींना न जुमानता टिकून राहणे यात आहे.

जर तुम्ही अपयशी ठरलात तर तुम्ही जगातील बहुसंख्य लोकांमधील एक आहात. मात्र तुम्ही त्या अपयशाला कसा प्रतिसाद देता, यावरून तुमचे वेगळेपण अधोरेखित होते.

मनोचिकित्सक व अधीक्षक.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल