- हितगुज
- डॉ. शुभांगी पारकर
पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे का अर्धा भरलेला आहे, हे आपण कसं ठरवतो? यामागे आपल्या नकळत आपली मनोवृत्ती काम करत असते. पाण्याच्या ग्लासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपली मनोवृत्ती ठरवते. मनोवृत्तीच आपल्या जगण्याचा ताल आणि लय ठरवत असते. म्हणूनच मनोवृत्तीचे विविध प्रकार समजून घेणं आवश्यक आहे.
सकारात्मक किंवा नकारात्मक मनोवृत्तीबद्दल अलीकडे बरंच बोललं जातं. पण ही ‘मनोवृत्ती’ म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, मनोवृत्ती म्हणजे एखाद्या परिस्थितीकडे पाहण्याचा आणि तिचा स्वीकार करण्याचा आपला दृष्टिकोन. म्हणजेच मनोवृत्ती ही एक मानसिक चौकट आहे आणि ती आपल्या विचारांवर, श्रद्धांवर आणि पूर्वग्रहांवर आधारित असते. आपली मनोवृत्ती आपल्या वर्तनावर आणि प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीवर परिणाम करत असते.
एखादी व्यक्ती समोरच्या गुंतागुंतीच्या माहितीचा अर्थ कसा लावेल, हे त्याच्या मनोवृत्तीवरून ठरत असतं. कारण मनोवृत्ती त्या व्यक्तीला केवळ स्वतःविषयीच नाही, तर त्याच्या-तिच्या आजूबाजूच्या गोष्टींबाबत वा परिस्थितीबाबत विचार करण्यासाठी सोप्या वैचारिक चौकटी पुरवत असते. उदाहरणार्थ, रुग्णासाठी त्याची-तिची मनोवृत्ती आजार आणि उपचार यांचं व्यापक स्वरूप समजून घेण्यासाठी एक प्रकारचा आधार किंवा स्रोत म्हणून काम करते.
अपेक्षा आणि मनोवृत्ती यातील फरक
अपेक्षा आणि मनोवृत्ती यात वरकरणी जवळचा संबंध दिसत असला, तरी या दोन बाबी सारख्या नसतात. अपेक्षा म्हणजे भविष्यातील विशिष्ट घटनांबाबत असलेली ठोस अटकळ किंवा श्रद्धा. त्याउलट मनोवृत्ती व्यक्तीला त्या त्या मनोवृत्तीशी सुसंगत अशा अनेक अपेक्षांकडे झुकवते. उदाहरणार्थ, ‘कर्करोग म्हणजे एक महाभयंकर रोग आहे’ ही जर व्यक्तीची मनोवृत्ती असेल तर त्यासोबत वेगवेगळ्या अपेक्षा, अटकळी जोडल्या जातात. उदाहरणार्थ, ‘उपचार खूप वेदनादायक असतील आणि अनेक गोष्टींचा मला आनंद घेता येणार नाही’ किंवा ‘मला या सगळ्याला तोंड देता येणार नाही.’ या अपेक्षा ‘उपचारातून बरे होता येईल की नाही?’ यासारख्या विशिष्ट अपेक्षेपेक्षा खूप व्यापक असतात. म्हणून आजार आणि उपचारांचा परिणाम समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या मनोवृत्ती समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.
स्थिर मनोवृत्ती आणि विकसनशील मनोवृत्ती
प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रोफेसर कॅरोल ड्वेक यांच्या मते मनोवृत्तीचे दोन मूलभूत प्रकार आहेत. स्थिर मनोवृत्ती (fixed) आणि वृद्धिंगत होणारी विकसनशील मनोवृत्ती (growth). स्थिर मनोवृत्ती असलेल्या व्यक्तींना असं वाटतं की, त्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता ठरलेली आहे. ती जन्मजात आणि अपरिवर्तनीय आहे आणि ती बदलता येत नाही. त्यामुळे यश हे केवळ प्रतिभा आणि हुशारीमुळे मिळतं, त्यासाठी प्रयत्नांची गरज नाही, असं यांना वाटतं. याउलट कठोर मेहनत, समर्पण आणि सातत्यामुळे आपण आपली कौशल्यं वाढवू शकतो, असं वृद्धिंगत होणारी मनोवृत्ती असणाऱ्यांना वाटतं. प्रत्येक अडथळा ही शिकण्याची आणि वाढीची संधी आहे, असंच ते मानतात. स्थिर मनोवृत्ती म्हणजे एखादं स्थिर, हालचाल न करणारं जलाशय आहे, जे बदलांना घाबरतं. त्यांना वाटतं की, अपयश त्यांच्या मर्यादा उघड करेल. दुसरीकडे, सतत विकसित होणारी, स्वत:ची वाढ करणारी मनोवृत्ती ही वाहत्या नदीसारखी आहे, ती गतिमान आहे. ती नवीन आव्हानांचं स्वागत करते, अडथळ्यांचं विश्लेषण करते आणि त्यातून वैयक्तिक प्रगती घडवून आणते.
मनोवृत्तीचे प्रकार
मनोवृत्तीचे विविध प्रकार असतात. या प्रकारांनुसार व्यक्तीचं जीवन प्रभावित होत असतं. योग्य मानसिकतेशिवाय कोणीही त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही. खाली काही उदाहरणं दिली आहेत-
सकारात्मक मनोवृत्ती (Optimistic Mindset) : अशा व्यक्तींना जीवन सकारात्मक वाटतं. ते विविध शक्यता पडताळून पाहतात, प्रत्येक प्रसंगात संधी शोधतात. भविष्यात चांगल्या गोष्टी घडतील यावर त्यांचा विश्वास असतो.
नकारात्मक मनोवृत्ती (Pessimistic Mindset) : अशा व्यक्तींना जीवन अडचणींनी आणि अडथळ्यांनी भरलेलं वाटतं. भविष्यात काहीही चांगलं होणार नाही, अडचणी टाळता येणार नाहीत, असं त्यांना वाटतं.
समृद्धतेची मनोवृत्ती (AbundanceMindset): असा दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींच्या मते जगात सर्व गोष्टींची भरपूर उपलब्धता आहे, चंगळ आहे. संधी, यश आणि आनंद हा प्रत्येकाला मिळू शकतो. प्रत्येकाला आपला भाग्याचा वाटा मिळणार आहे.
टंचाईची मनोवृत्ती (Scarcity Mindset) : या जगात गोष्टी मर्यादित आहेत. सगळ्याचं दुर्भिक्ष्य आहे, असं या मनोवृत्तीला वाटतं. त्यांच्या मते यश आणि आनंद या बाबी काही निवडक लोकांसाठीच आहेत आणि इतरांच्या वाट्याला केवळ स्पर्धा आणि कष्ट आहेत.
या वेगवेगळ्या मनोवृत्तींच्या अभ्यासातून आपण आपली ‘विचार पद्धती’ ओळखू शकतो आणि गरज असल्यास त्यात बदलही घडवून आणू शकतो. वाढ होणारी मनोवृत्ती विकसित करून आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून आपण अडथळ्यांची शर्यत पार करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो.
मानसिक फिल्टर
मनोवृत्ती ही केवळ तात्त्विक संकल्पना नाही, तर ती वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली बाब आहे. आपल्या मेंदूमध्ये परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता असते. म्हणूनच आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत आणि रचनेतही प्रत्यक्ष बदल घडू शकतो. मनोवृत्ती म्हणजे एक प्रकारचा ‘मानसिक फिल्टर’ जो आपले विचार, श्रद्धा आणि वर्तन घडवतो. स्थिर मानसिकता असलेले लोक त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि प्रतिभेला ‘जैसे थे’ ठेवतात, तर वृद्धिंगत होणारी मानसिकता असलेले लोक कठोर परिश्रम आणि सरावावर विश्वास ठेवतात आणि त्या माध्यमातून आपण कोणत्याही गोष्टीचा विकास साधू शकतो, असे मानतात. जेव्हा जीवनात काही गोष्टी सहजसुलभतेने पार पडतात तेव्हा काही महत्त्वाकांक्षी व्यक्ती किंचित कंटाळलेल्या वाटतात. कारण त्यांना कठीण प्रसंग आवडतो. आव्हानांना सामोरं जाणं, त्यातून शिकणं आणि स्वतःमध्ये सुधारणा करणं त्यांना आवडतं. हे त्यांच्या वृद्धिंगत होणाऱ्या मनोवृत्तीचं लक्षण असतं. ही अशी मनोवृत्ती व्यक्तीला प्रेरणा देत असते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी एक सुंदर विधान केलं आहे. ते म्हणतात, ‘जीवन म्हणजे स्वतःला शोधणं नाही. जीवन म्हणजे स्वतःला निर्माण करणं.’
चुकीच्या मनोवृत्तीचा बांध
चुकीच्या मनोवृत्तीमुळे आपली प्रगतीची वाट अडवली जाते. उदाहरणार्थ, आपल्याला वाटतं की, आपल्या बुद्धिमत्तेला किंवा क्षमतेला मर्यादा आहे. ही वृत्ती आपली प्रगती अमुक पातळीपर्यंतच होऊ देते वा थांबवू शकते. काही मनोवृत्ती प्रक्रियात्मक असतात. जर मी अधिक गोष्टी शिकून घेतल्या तरच मी तज्ज्ञ होईन, असं या मनोवृत्तीला वाटतं. ही वृत्तीही योग्य नाही. आपल्याकडून एकही चूक होऊ नये, ही भित्री मनोवृत्ती आपली जिज्ञासा आणि प्रयोगशीलता मारून टाकते. सफलता ही परिपूर्ण असण्यामध्ये नसते. ती प्रयत्नांमध्ये असते. जेव्हा तुम्ही रोज प्रयत्न करता तेव्हाच परिवर्तन घडतं. तुम्ही नवीन दृष्टिकोनाच्या शोधात असाल, सर्जनशीलतेची एक ठिणगी शोधत असाल किंवा विश्वासाने झेप घेण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर अशावेळी यशासाठी, विकासासाठी, तुम्हाला महानतेकडे नेण्यासाठी जुळवून घेणारी मनोवृत्ती महत्त्वाची ठरते.
आपली मनोवृत्तीच आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडवत असते. आपण संकटं, अडथळे आणि संधी यांच्याकडे कसं पाहतो, यावर ती प्रभाव टाकते. आपली मानसिकता विकसनशील असेल तर आपण अडचणींकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतो. याउलट स्थिर मनोवृत्तीला अडचणी म्हणजे आपल्या मर्यादांची सीमा वाटते. आपली मनोवृत्ती वेळोवेळी हे ठरवत असते की आपण नवीन आव्हानं स्वीकारतो की टाळतो. आपण आकाशाला गवसणी घालणार आहोत की नाही.
जरी ‘स्थिर’ आणि ‘विकसनशील’ मनोवृत्ती सर्वाधिक चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात आपले अनुभव, भावना आणि श्रद्धा यावर आधारित आपल्या मनोवृत्तीचा पट कधी एकीकडे झुकतो, तर कधी दुसरीकडे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोवृत्ती ही अपरिवर्तनीय नाही, ती बदलू शकते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण इच्छाशक्ती आणि प्रयत्नाने आपल्या मनोवृत्तीत बदल घडवून आणू शकतो. तिला सकारात्मक पद्धतीने घडवू शकतो. आपलं मन हे एक शक्तिशाली साधन आहे, जे आपल्या वास्तवात बदल घडवून आणण्यास आणि आपल्या सभोवतालचं जग बदलण्यास सक्षम आहे. परंतु वैयक्तिक विकासाच्या आपल्या प्रवासात पुढे जाण्यासाठी थोडी प्रेरणा आणि प्रोत्साहन यांची आवश्यकता असते.
मनोवृत्तीचं महत्त्व
योग्य मनोवृत्ती आपल्या जीवनाचा पाया आहे. ती आपल्या दृष्टिकोनाला, निर्णयांना आणि यशाच्या प्रवासाला आकार देते. योग्य मनोवृत्ती स्वीकारल्याने आपण केवळ यश मिळवू शकत नाही, तर त्याचा मनापासून आनंदही घेऊ शकतो. योग्य मनोवृत्ती असणं हे वैयक्तिक व व्यावसायिक यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. ती आपल्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला दिशा आणि गती देते, आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता घडवते.
वैयक्तिक जीवनात सकारात्मक मनोवृत्तीमुळे संकटाच्या वेळीही आशा कायम असते. सकारात्मकता जीवनातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष देण्यास आणि आनंद घेण्यास मदत करते, तर नकारात्मक मनोवृत्तीमुळे निराशा, चिंता आणि नैराश्य निर्माण होऊ शकते. विचारांची दिशाही चुकत जाते. त्यातून आयुष्यातील सौंदर्य आणि मूल्य हरवत जातं.
विकसनशील मनोवृत्ती असल्यास व्यावसायिक जीवनात नवीन संधी आत्मविश्वासाने स्वीकारली जाते. आपली कौशल्य विकसित करण्यासाठी मेहनत घेतली जाते. अशा व्यक्ती अयशस्वी होण्याची भीती न बाळगता प्रयत्न करत राहतात. त्यामुळे त्यांची कारकीर्द प्रगतिशील राहते. जर तुम्ही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललात, तर तुम्ही ज्या गोष्टींकडे पाहता त्या बदलतील. पण जर मनोवृत्ती लवचिक नसेल, तर नवीन गोष्टी शिकायला, संधीचा लाभ उठवायला आणि जोखीम घ्यायला मन घाबरतं. त्यामुळे प्रगती मंदावतं. आयुष्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे एकही धोका न पत्करणं.
शिक्षणापासून ते नातेसंबंधांपर्यंत विविध क्षेत्रांतील यशामध्ये आपल्या मनोवृत्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, हे आता संशोधनातून सिद्ध झालं आहे. शिक्षण क्षेत्रात विकसनशील मनोवृत्ती असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगली कामगिरी करता येते. कारण आपल्या कौशल्यांचा विकास प्रयत्न, सराव आणि चिकाटीमुळे शक्य आहे, असं ही मनोवृत्ती मानते. याच्या उलट सुस्तावलेली स्थिर मनोवृत्ती असणारे विद्यार्थी आपली बौद्धिक क्षमता ही जन्मतःच ठरलेली आहे आणि त्यात फारसा बदल घडणं शक्य नाही, असं मानतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांमध्ये नवं काही शिकण्याची इच्छाशक्ती कमी असते आणि अपयशाची भीती अधिक असते. सकारात्मक आणि विकसनशील मनोवृत्ती अंगिकारल्यास, आपण कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे मनोवृत्ती बदलण्याचे आणि विकसित करण्याचे प्रयत्न करणं हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक ठरतं.
शेवटी...मनोवृत्ती ही केवळ मानसिक चौकट नसून ती आपल्या वर्तनावर, आरोग्यावर आणि संवादशैलीवर खोल परिणाम करते. योग्य मनोवृत्ती स्वीकारल्याने आपण समस्यांकडे संधी म्हणून पाहू लागतो, बदलांना सामोरे जातो आणि अधिक सकारात्मक, सकस जीवन जगण्यासाठी सक्षम होतो. मनोवृत्ती म्हणजे केवळ विचारांची सवय नसून यशाचा गाभा आहे. समाधानाचा स्रोत आहे. मानवी क्षमता अमर्याद आहे. तुम्हाला जे करण्यासाठी निर्माण केले आहे ते करा. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही हळू चाललात तरी काही फरक पडत नाही.
मनोचिकित्सक व अधिष्ठाता