सध्या आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काय खावे, काय टाळावे आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, याकडे आता अनेकांचे लक्ष असते. वजन कमी करण्यासाठी आणि शरीर फिट ठेवण्यासाठी अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करत आहेत. अशातच आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मनुका घातलेल्या दह्याचा खास उपाय सांगितला आहे.
मनुका घातलेले दही का ठरते फायदेशीर?
ऋजुता दिवेकर यांच्या मते, दही हे उत्तम प्रोबायोटिक आहे, तर मनुकांमध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यासाठीही मदत मिळू शकते.
त्याचबरोबर, हे मिश्रण कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त मानले जाते. वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांसाठीही हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.
पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम
मनुका घातलेले दही खाल्ल्याने पोटातील सूज आणि ब्लोटिंग कमी होण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन पचन सुधारते. यामुळे शरीर हलके वाटते आणि फिटनेस सुधारण्यास मदत मिळते.
हाडे आणि दातांसाठीही फायदेशीर
या मिश्रणामुळे शरीराला कॅल्शियम, फायबर आणि चांगले बॅक्टेरिया मिळतात. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. तसेच दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही हा उपाय फायदेशीर मानला जातो.
मनुका घालून दही कसे तयार कराल?
सर्वप्रथम कोमट दूध एका भांड्यात घ्या. त्यात ४ ते ५ मनुका आणि थोडेसे जुने दही मिसळा. हे मिश्रण नीट हलवून ८ तास थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. त्यानंतर तयार झालेले दही तुम्ही संध्याकाळच्या स्नॅकसाठी किंवा जेवणासोबत खाऊ शकता.
लक्षात ठेवा...
हा उपाय वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतो. मात्र, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)