नखांवर पांढरे डाग, काळी रेषा किंवा पिवळेपणा? डॉक्टरांनी सांगितले शरीर देत असलेले ५ महत्त्वाचे संकेत 
लाईफस्टाईल

नखांवर पांढरे डाग, काळी रेषा किंवा पिवळेपणा? डॉक्टरांनी सांगितले शरीर देत असलेले ५ महत्त्वाचे संकेत

नखांवर पांढरे डाग, काळी रेषा, पिवळेपणा किंवा नखांचा आकार बदलला आहे का? डॉक्टरांच्या मते नखांमध्ये दिसणारे हे ५ बदल आरोग्याशी संबंधित संकेत देऊ शकतात.

Mayuri Gawade

नखं सुंदर दिसावीत म्हणून आपण मॅनिक्युअर, पेडिक्युअरपासून ते वेगवेगळ्या नेल केअरपर्यंत अनेक गोष्टी करतो. पण तुमच्या नखांकडे फक्त सौंदर्याच्या दृष्टीने पाहू नका. नखांचा रंग, आकार किंवा त्यात अचानक झालेला बदल शरीराच्या आरोग्याबद्दल काही संकेत देऊ शकतो. डॉक्टर कुणाल सूद यांनी सोशल मीडियावर नखांमध्ये दिसणाऱ्या अशाच पाच बदलांबद्दल माहिती दिली आहे. मात्र, यापैकी कोणताही बदल दिसला म्हणजे एखादा आजार आहेच, असा थेट निष्कर्ष काढू नये.

१. नखं चमच्यासारखी दिसत आहेत?

नखाच्या मध्यभागी खोलगटपणा येऊन ते चमच्यासारखे दिसत असेल, तर त्याकडे लक्ष द्या. अशा प्रकारच्या नखांना कोइलोनिकिया म्हणतात. हा बदल दीर्घकाळ शरीरात लोहाची कमतरता असल्याशी संबंधित असू शकतो. मात्र, केवळ नखांचा आकार पाहून लोहाची कमतरता निश्चित करता येत नाही. त्यासाठी रक्ताची तपासणी आवश्यक असते.

२. नखांवर पांढरे डाग दिसतात?

नखांवर छोटे पांढरे डाग दिसले तर लगेच घाबरण्याची गरज नाही. अनेकदा नखाला लागलेली किरकोळ दुखापत, मॅनिक्युअर किंवा नखं चावण्यामुळे असे डाग येतात आणि नख वाढत गेल्यावर ते पुढे सरकतात.

मात्र, कोणतीही दुखापत झालेली नसताना असे डाग वारंवार दिसत असतील, तर त्यामागचं कारण डॉक्टरांकडून तपासून घेणं योग्य ठरेल. फक्त पांढरे डाग दिसले म्हणून कॅल्शियम किंवा झिंकची कमतरता आहे, असं मानणं योग्य नाही.

३. एका नखावर अचानक काळी रेषा आली?

एका नखावर अचानक काळी किंवा गडद रंगाची रेषा दिसली आणि ती कायम राहिली, तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. बहुतेक वेळा अशा रेषा गंभीर कारणामुळे नसतात. मात्र, क्वचित प्रसंगी ती नखाच्या खाली होणाऱ्या मेलानोमा या त्वचेच्या कर्करोगाचा संकेत असू शकते.

विशेषतः रेषा रुंद होत असेल, तिचा रंग अनियमित असेल किंवा नखाच्या आजूबाजूच्या त्वचेपर्यंत रंग पसरत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

४. नखं पिवळी आणि जाड झाली आहेत?

पायाची नखं जाड होऊन पिवळसर दिसत असतील, तर त्यामागे बुरशीचा संसर्ग हे एक सामान्य कारण असू शकतं. अशा वेळी नखं जाड होणे, रंग बदलणे, तुटणे किंवा नखाखाली काही थर जमा होणे अशी लक्षणं दिसू शकतात.

पण प्रत्येक पिवळं किंवा जाड नख म्हणजे बुरशीचा संसर्ग असेलच असं नाही. दुखापत, सोरायसिस किंवा त्वचेच्या इतर समस्यांमुळेही नखांचा रंग आणि पोत बदलू शकतो. त्यामुळे स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं चांगलं.

५. बोटांची टोकं फुगून नखं जास्त वाकली आहेत?

नखं नेहमीपेक्षा जास्त वाकलेली दिसत असतील आणि बोटांची टोकंही फुगल्यासारखी वाटत असतील, तर याला क्लबिंग म्हणतात. हा बदल हळूहळू होत असल्याने अनेकदा तो लगेच लक्षातही येत नाही.

नवीन स्वरूपात क्लबिंग दिसल्यास त्याची वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कारण काही वेळा हा बदल फुफ्फुस, हृदय, यकृत किंवा आतड्यांशी संबंधित आजारांशी जोडलेला असू शकतो.

नखांमध्ये बदल दिसला तर काय करायचं?

नखांचा रंग, आकार किंवा पोत बदलला म्हणजे तुम्हाला एखादा आजार आहे, असा अर्थ होत नाही. अनेक बदल साध्या दुखापतीमुळे किंवा इतर सामान्य कारणांमुळेही होऊ शकतात. मात्र, नवीन आणि सतत राहणारा बदल दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठीआहे. नखांमध्ये दिसणाऱ्या बदलांवरून स्वतःच कोणताही आजार ठरवू नका किंवा उपचार सुरू करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्या.)

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा