Health Care: डेंग्यू ताप, डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग, जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण धोका आहे. योग्य उपचार सुरू करण्यासाठी आणि गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी वेळेवर निदान होणे महत्वाचे आहे. डेंग्यू तापाची चाचणी केव्हा आणि कशी करावी हे समजून घेणे आवश्यक आहे. याबद्दल अधिक न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळेचे डॉ. अजय शाह यांच्या कडून अधिक जाणून घेऊयात...
चाचणी कधी करावी?
सामान्य चिन्हे आणि लक्षणांमध्ये उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ, मळमळ, उलट्या आणि थकवा यांचा समावेश होतो. लक्षणांची सुरुवात सामान्यत: संक्रमित डास चावल्यानंतर ४ ते १० दिवसांनी होते. लक्षणे दिसल्यास दोन आठवड्यांच्या आत चाचणी करावी. डेंग्यूचा प्रादुर्भाव लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये होऊ शकतो, त्यामुळे छोट्या सहलीवरून परतल्यानंतरही सतर्क राहणे आवश्यक आहे. डेंग्यूची लक्षणे अनुभवणाऱ्या व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
डेंग्यू तापाचे निदान झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींनी लक्षणांसाठी स्वतःचे निरीक्षण केले पाहिजे आणि आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी करावी.
चाचणी कशी करून घ्यावी?
डॉक्टरांना भेटा: जर तुम्हाला डेंग्यूचा ताप असल्याची किंवा लागण झाली असल्याची शंका आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा. तुमची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि तुम्ही कुठे बाहेरगावी गेले असल्यास त्या माहितीवरून तुम्हाला चाचणी करावी लागेल का याबाबत ते सांगतील.
रक्त तपासणी: डेंग्यूचा ताप आहे का नाही हे नक्की करण्यासाठी रक्त तपासणी करावी लागते, त्यामध्ये तुम्हाला डेंग्यू संसर्ग झाला आहे का किंवा संसर्गापासून रक्षण करण्यासाठी रोग प्रतिकार शक्तीने काही अॅटी बॉडीज तयार केल्या आहेत का हे पाहिले जाते. साधारणपणे एनएस1 अॅटीजेन टेस्ट आणि सेरॉलॉजीकल टेस्ट (IgM आणि IgG अॅटी बॉडीज) केल्या जातात.
त्रास जास्त असल्यास हॉस्पिटलायझेशन: डेंग्यूच्या तापाचे प्रमाण वाढल्यास, खास करून तीव्र पोटदुखी, वारंवार उलट्या होणे, रक्तस्त्राव किंवा शॉकची लक्षणे दिसल्यास योग्य देखभाली साठी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट व्हावे लागते.
डॉक्टरांचा सल्ला ऐका: चाचण्यांचे परिणाम आणि तुमच्या आजाराची तीव्रता यानुसार योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतील, त्यामध्ये विश्रांती, हायड्रेशन, वेदना शामक औषधे, आणि होणाऱ्या त्रासावर लक्ष ठेवणे याचा समावेश असेल
प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?
डेंग्यूच्या तापावर विशिष्ट उपचार नसले तरी संसर्ग रोखण्यासाठी डास चावणार नाहीत याची काळजी घ्यावी. कीटकनाशके फवारा, लांब बाह्याचे कपडे वापरा. डासांच्या जाळ्या किंवा स्क्रीन वापरुन स्वतःचे डासांपासून रक्षण करा.
लवकर निदान आणि वेळीच औषधोपचार याने डेंग्यूच्या तापाने होणारे गंभीर परिणाम टाळता येतात. रोगाच्या लक्षणांबाबत दक्ष राहिल्यास आणि गरज वाटल्यास तपासणी करून घेतल्यास आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक पावले उचलू शकतो.