लाईफस्टाईल

थंडीची चाहूल आणि ओठांचा कोरडेपणा; हिवाळ्यात घ्या योग्य काळजी

हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने त्वचेतील ओलावा झपाट्याने कमी होतो. याचा सर्वाधिक परिणाम ओठांवर दिसतो, कारण ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असते.

नेहा जाधव - तांबे

हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने त्वचेतील ओलावा झपाट्याने कमी होतो. याचा सर्वाधिक परिणाम ओठांवर दिसतो, कारण ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असते. त्यामुळे ओठ फाटणे, सोलणे आणि दुखणे अशा समस्या वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर त्वचारोग तज्ज्ञांनी ओठांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सुचवले आहेत.

पाण्याचे प्रमाण वाढवा

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात लोक पाणी कमी पितात, ज्यामुळे शरीर निर्जलीकरणाकडे झुकते आणि त्याचा थेट परिणाम ओठांवर होतो. पाणी कमी पिणे ही ओठ फाटण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिण्याचे प्रमाण कायम ठेवणे आवश्यक आहे.

घाणेरडी सवय टाळा

बर्‍याच लोकांना ओठ वारंवार चाटण्याची सवय असते. पण लाळ सुकताच ओठ अधिकच कोरडे पडतात आणि संवेदनशीलता वाढते. त्यामुळे ही सवय टाळणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच अतितिखट किंवा आम्लयुक्त पदार्थांचे सेवनही ओठांच्या त्वचेला त्रास देऊ शकते.

तूप आणि नारळाचे तेल

ओठांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकवण्यासाठी नारळाचे तेल, बदाम तेल, तूप, शीया बटर किंवा मध यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर उपयुक्त ठरतो. त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, विशेषतः झोपण्यापूर्वी ओठांवर तूप किंवा नारळाचे तेल लावल्यास सकाळी ओठ मऊ राहतात आणि सोलण्याची समस्या कमी होते.

स्क्रब करणे फायदेशीर

हिवाळ्यात ओठांवर मृत त्वचा जमण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी आठवड्यातून दोनदा साखर आणि मधाचा हलका स्क्रब करणे फायदेशीर ठरते. यामुळे मृत त्वचा दूर होते आणि ओठांचा रंग व पोत सुधारतो. तसेच SPF असलेला लिप बाम वापरणे आवश्यक असल्याचे त्वचारोगतज्ज्ञांनी नमूद केले आहे, कारण UV किरणांमुळे ओठ काळसर होण्याची शक्यता असते.

विशेष म्हणजे, अनेक जण फाटलेल्या त्वचेवरची सोलणारी थर हाताने खेचून काढतात; परंतु यामुळे ओठांना जखमा होऊ शकतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे ओठांना नैसर्गिकरित्या दुरुस्त होऊ देणे आणि नियमित ओलावा पुरवणे महत्त्वाचे ठरते.

तज्ज्ञांच्या मते, हे उपाय नियमित केल्यास ओठ वर्षभर मऊ, गुलाबी आणि निरोगी राहू शकतात.

पुण्यात दिवसाढवळ्याही बिबट्याची दहशत; शेतकऱ्यांचे स्वसंरक्षणासाठी मोठं पाऊल, गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा

मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोनने खळबळ! MMRDA चे स्पष्टीकरण; आदित्य ठाकरे संतप्त, म्हणाले, "घरांमध्ये डोकावून..."

यंदा फ्लेमिंगो पक्षांचे उशिरा आगमन; पर्यावरणीय ताणाचे गंभीर संकेत, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

नंदुरबार : देवगोई घाटात शालेय बस दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, ३० हून अधिक विद्यार्थी जखमी

बार्शीत धक्कादायक घटना; आईने घेतला गळफास, १४ महिन्याच्या चिमुकल्यालाही दिलं विष, बाळाची प्रकृती गंभीर