जागतिक जल दिन दरवर्षी २२ मार्च रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे मान्यता दिलेल्या या महत्त्वपूर्ण दिवसाचे उद्दिष्ट जगभरात गोड्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचे समर्थन करणे हे आहे. पाण्याचे महत्त्व समजून घेऊन जगभरातील विविध देश यासाठी मोहिमा राबवत आहेत. २४ देशांनी परस्पर जलसंपत्तीची पुष्टी करण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली आहे. जागतिक जल दिनानिमित्त जाणून घेऊया याचा इतिहास, महत्त्व आणि काय आहे यंदाची थीम.
जागतिक जल दिनाचे महत्त्व
पाणी हे जीवन आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. केवळ मानवच नाही तर जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला पाणी आवश्यक आहे. मानवी शरीरात ७० टक्के पाणी आहे आणि पृथ्वीवर देखील ७० टक्के पाणी आहे. परंतु गोडे पाणी केवळ ३ टक्के आहे आणि म्हणूनच पाणी वाचवणे आवश्यक आहे. काही अहवालानुसार सध्या २.२ अब्ज लोकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. जागतिक जलदिनाचा मुख्य उद्देश २०३० पर्यंत सर्वांसाठी शाश्वतता आणि स्वच्छता या कामगिरीला पाठिंबा देणे हे आहे.
जागतिक जल दिनाचा इतिहास
१९९२ मध्ये 'संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेच्या' अजेंडा २१ मध्ये 'जागतिक जल दिन' ही संकल्पना मांडण्यात आली. डिसेंबर १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृत ठराव मंजूर करून दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी जागतिक जल विकास अहवाल प्रसिद्ध करते. तसेच संयुक्त राष्ट्र दरवर्षी जागतिक जल दिनासाठी एक विशेष थीम निवडत असते. जाणून घ्या २०२५ साठी जागतिक जल दिनाची थीम नेमकी काय आहे?
हिमनदी जतन
२०२५ च्या जागतिक जल दिनाची थीम 'हिमनदी जतन' आहे. पृथ्वीच्या भूभागाचा सुमारे १० टक्के भाग हिमनद्या, बर्फाचे थर आणि बर्फाच्या टोप्यांनी व्यापलेला आहे, ज्यामध्ये ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाचा समावेश आहे. हिमनद्या गोड्या पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत, पृथ्वीवरील सुमारे तीन चतुर्थांश गोड्या पाण्याचा साठा हिमनद्यांमध्ये आहे. तथापि, हरितगृह वायूंच्या परिणामामुळे, हिमनद्या आणि बर्फाचे थर वितळत आहेत, ज्यामुळे जागतिक समुद्र पातळी वाढत आहे. या वर्षीची थीम जगातील हिमनद्यांच्या संरक्षणावर प्रकाश टाकण्याचे उद्दिष्ट ठेवते.