दौंड : शहरातील बोरावले नगर भागात एका प्लास्टिकच्या डब्यात १० अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. हे सर्व अर्भक प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेली आढळले. यामुळे बेकायदा गर्भपात केले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून आसपासची रुग्णालये, क्लीनिक आणि गर्भपात केंद्रांची चौकशी करण्यात येत आहे. या अर्भकांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनाही तपासणीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
अर्भकांचा विषय हाताळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. येमपल्ले दौंडमध्ये येणार आहेत, तर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गुजर पोलीस ठाण्यात आहेत. कायद्यानुसार दोनपेक्षा अधिक अर्भक आढळल्यास उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षकांची चौकशी केली जाते व दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई होते.