महाराष्ट्र

बारावीची परीक्षा ११, तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून; दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर छापील वेळापत्रक अंतिम असणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून शाळा, महाविद्यालयांकडून छापील स्वरूपात देण्यात येणारे हॉलतिकीटवरील वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले.

फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये राज्य मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात दहावी, बारावी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे, यासाठी मंडळामार्फत काही वर्षांपासून काही महिने अगोदर वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्याप्रमाणे मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे, तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालवधीत होईल. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होईल. मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून शाळा, महाविद्यालयांकडून छापील स्वरूपात देण्यात येणारे हॉलतिकीटवरील वेळापत्रक अंतिम असेल, असेही शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे, असे आवाहनही मंडळाने केले आहे. अन्य संकेतस्थळावरील किवा व्हॉट्सॲॅपवरून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले.

गणित आणि विज्ञानाच्या निकषांमध्ये बदल नाही

राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्यावर्षी या निकषांमध्ये बदल होतील, त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल. याची नोंद शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी, असे मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले