जळगाव : जळगाव जिल्ह्यात यंदाच्या १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४४३ आत्महत्यांची नोंद झाली असून, त्यापैकी लग्न न जमल्याने २९ युवकांनी आत्महत्या केल्याची बाब चिंताजनक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. आत्महत्यांच्या कारणांचे सांख्यिकी विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली.
धिवरे यांनी सांगितले की, सहा महिन्यांत झालेल्या ४४३ आत्महत्यांमध्ये ३८३ प्रौढ, ८ अल्पवयीन मुले, २९ महिला आणि ११ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, दारूच्या व्यसनामुळे ९०, नैराश्यामुळे ८७, कौटुंबिक कारणांमुळे ७८, तर कर्जबाजारीपणामुळे ५२ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. याशिवाय परीक्षेच्या ताणामुळे ११, मानसिक आजारामुळे ८ आणि प्रेमसंबंधांशी संबंधित कारणांमुळे १२ जणांनी आत्महत्या केल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे.
सामाजिक चिंतेचा विषय
विशेषतः लग्न न जमाल्याने २९ युवकांनी टोकाचे पाऊल उचलल्याची बाब ही गंभीर सामाजिक चिंतेचा विषय असल्याचे धिवरे यांनी नमूद केले. बदलती सामाजिक परिस्थिती, ग्रामीण भागातील युवकांना विवाहासाठी येणाऱ्या अडचणी, तसेच मानसिक ताण याकडे समाजाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात सरासरी दरमहा ७४ आणि दररोज दोन ते तीन आत्महत्यांची नोंद होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांमध्ये कौटुंबिक तणाव आणि नैराश्य, तर अल्पवयीन मुला-मुलींमध्ये कौटुंबिक वातावरण, मानसिक ताण आणि परीक्षेचा ताण ही प्रमुख कारणे असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले.
नागरिकांनी मानसिक तणावाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये, कुटुंबातील सदस्यांनी नियमित संवाद साधावा, आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच कर्ज घ्यावे आणि अडचणीत असलेल्या व्यक्तींना वेळेत भावनिक आधार द्यावा. मानसिक आरोग्याबाबत वेळेवर समुपदेशन आणि तज्ज्ञांची मदत घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.श्रीकांत धिवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक