महाराष्ट्र

वर्षभरातच समृद्धीला भेगा! समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराने पोखरला,महामार्गातून सत्ताधाऱ्यांची समृद्धी - नाना पटोले

भ्रष्टाचाराने महामार्ग पोखरला असून वर्षभरातच त्याला भेगा पडल्या आहेत. एकीकडे ‘मृत्यूचा महामार्ग’ अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. प्रत्येक विभागात कमिशनखोरी सुरू आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराने महामार्ग पोखरला असून वर्षभरातच त्याला भेगा पडल्या आहेत. एकीकडे ‘मृत्यूचा महामार्ग’ अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

समृद्धी महामार्गात झालेल्या भ्रष्टाचारामुळेच रस्त्याला भेगा पडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या १८ हजार कोटी रुपयांच्या ‘अटल सेतू’लाही भेगा पडल्याचे नुकतेच उघड झाले होते. समृद्धीला भेगा, अटल सेतूला भेगा यातून मोदींची गॅरंटी किती तकलादू आहे हे स्पष्ट झाले. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे धिंडवडे निघत आहेत, परंतु महायुती सरकारला त्याचे जराही सोयरसुतक नाही, असे पटोले म्हणाले.

अनिल अंबानींचे १७०० कोटींचे कर्ज माफ

महायुती सरकार उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करते आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतून राज्यातील भगिनींना मात्र फक्त १५०० रुपये देऊन फसवणूक करत आहे. प्रचंड महागाई असताना सरकार केवळ १५०० रुपये देऊन माता-भगिनींची बोळवण करत आहे, असेही पटोले म्हणाले.

फडणवीसांनीच आरक्षण देण्याचे आश्वासन दिले

सरकारने काल मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक चर्चेत आणला. वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस यांनीच २०१४ साली धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार असतानाही केवळ विरोधकांवर कुरघोडी करायची यासाठी सत्ताधारी पक्षांनी गोंधळ घातला.

सरकारकडून लोकशाहीचा खून

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर विरोधी पक्ष सरकारचे पितळ उघडे पाडणार होते, पण गोंधळात पुरवणी मागण्या मान्य करून सरकारने लोकशाहीचा खून केला. विधानसभेचे अध्यक्ष एकतर्फी कामकाज करत होते, विरोधकांना बोलू दिले जात नव्हते. फक्त सत्ताधारी मंत्री व सदस्यांनाच ते बोलू देत होते. अध्यक्षांनी पक्षपाती राजकारण करून महाराष्ट्र विधानसभेच्या परंपरेला काळीमा फासला आहे. शिंदे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही नाना पटोले म्हणाले.

दुरुस्तीचे काम तातडीने सुरू

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजी नगरजवळील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील मार्गिकेची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. या मार्गिकेवरील साखळी क्र. ४४३/६५० वर छत्रपती संभाजी नगर येथील मौजे फतियाबादजवळील सुमारे ४० मी. लांबीत काँक्रीट पॅनेलमध्ये भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत दखल घेऊन तत्परतेने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंगे यांनी सांगितले. हा महामार्ग या ठिकाणी ३ मीटरच्या भरावावरून जात आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले