समुपदेशनाद्वारे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आरोग्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी (Photo-X/@PHDMahaHealth)
महाराष्ट्र

समुपदेशनाद्वारे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आरोग्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेत यंदा प्रथमच समुपदेशनाधारित, पारदर्शक आणि तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेत यंदा प्रथमच समुपदेशनाधारित, पारदर्शक आणि तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्यात आला. राज्यातील एकूण ४,५०६ बदलीपात्र कर्मचाऱ्यांपैकी ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शिफारसी करण्यात आल्याने ही प्रक्रिया राज्य प्रशासनातील एक आदर्श उपक्रम म्हणून पुढे आली आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता, पसंतीक्रम, दुर्गम भागातील सेवा, वैद्यकीय व कौटुंबिक परिस्थिती यांचा विचार करून बदली प्रक्रिया पार पडल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास, समाधान आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सचिव-२, आयुक्त आरोग्य सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक आरोग्य सेवा (प्राथमिक) यांच्या प्रशासकीय नियोजनातून संपूर्ण प्रक्रियेचे बारकाईने नियोजन करण्यात आले. प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, हरकतींचे तत्काळ निवारण आणि प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यात यश आले.

परिमंडळ कार्यक्रम प्रमुख, तसेच राज्यस्तरीय कार्यक्रम प्रमुख यांच्या उपस्थितीत स्तरावरील बदल्या समन्वयातून करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, नाशिक, कोल्हापूर, पुणे, लातूर व ठाणे या परिमंडळांसह विविध विशेष आरोग्य संस्थांमध्ये १३ ते २३ मे दरम्यान समुपदेशन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे, लातूर, कोल्हापूर, अकोला आणि ठाणे या सर्व परिमंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदली शिफारसी करण्यात आल्या असून प्रक्रिया सुरळीत आणि वादविरहितपणे पार पडली.

या प्रक्रियेत रिक्त पदांची आणि बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी संकेतस्थळावर व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली. राज्यस्तरीय निरीक्षकांची नियुक्ती करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया ही विभागाच्या समाजमाध्यमांवर पारदर्शकपणे टाकण्यात आल्या व हजारो कर्मचाऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिल्याने कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाला किंवा गैरसमजाला वाव न देता प्रक्रिया पूर्ण करण्यात यश आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता आणण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेली ही समुपदेशन प्रक्रिया राज्य प्रशासनासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरत असून, भविष्यातील कर्मचारी व्यवस्थापनासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. यावर्षी बदली प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचाही चांगला प्रतिसाद व सहकार्य मिळाले त्यामुळे या बदल्या अधिक नियोजनबद्ध व सर्वांच्या सहयोगामुळे पारदर्शकपणे विभागाला करता आल्या अशी भावना संचालक, आरोग्य सेवा (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांनी व्यक्त केली आहे.

या विभागात झाल्या बदल्या

परिचारिका संवर्गातील १,५७५, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) संवर्गातील ८०८, कनिष्ठ लिपिक संवर्गातील १९७, औषध निर्माण अधिकारी संवर्गातील १६० आणि प्रयोगशाळा सहायक संवर्गातील १४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे निश्चित करण्यात आल्या. यामुळे अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेल्या पारदर्शकतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कर्मचारी संघटनांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

मान्सूनची गती धीमी, तूर्तास हलक्या सरी; १५ जूनपर्यंत पेरणी नको - सरकारचे आवाहन

इंडिया आघाडीची आज बैठक; काँग्रेससह २३ पक्ष एकत्र येणार

गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर कारवाई; दोन कोटी किमतीचा गुटखा जप्त

मुंबई ‘मेट्रो-१’, १२ वर्षे, १२५ कोटी प्रवासी