९९ व्या साहित्य संमेलनाचा ध्वजारोहणाने शुभारंभ; राज्य पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत, राज्यगीत केले सादर  
महाराष्ट्र

९९ व्या साहित्य संमेलनाचा ध्वजारोहणाने शुभारंभ; राज्य पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत, राज्यगीत केले सादर

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे १ ते ४ जानेवारी या कालावधीत शाहू स्टेडियम येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहुपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आले आहे.

Swapnil S

पुणे : ऐतिहासिक नगरी सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा शुभारंभ गुरुवारी ध्वजारोहणाने उत्साही वातावरणात झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ९९व्या साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्य पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत तसेच राज्यगीत सादर केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे १ ते ४ जानेवारी या कालावधीत शाहू स्टेडियम येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहुपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, कवी विठ्ठल वाघ, मराठी विश्र्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आदी उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

कवीकट्टा, प्रकाशनकट्टाही फुलला

साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी ध्वजारोहणासह कवीकट्टा, प्रकाशनकट्टा यांचेही उद‌्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते कवीकट्ट्याचे उद‌्घाटन करण्यात आले. भालचंद्र जोशी म्हणाले, शाळकरी जीवनापासून कवितेशी संबंध आला, कारण माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. मराठी साहित्यातील अनेक मोठे कवी पाठ्यपुस्तकांतून माहित झाले. त्यांच्या सर्व कविता त्या वयात कळल्या, असे म्हणता येणार नाही. पण आता त्यांचे अर्थ समजतात. केशवसुतांची ‘तुतारी’ आज कळू शकते. ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’, असे केशवसुतांनी म्हटले आहे. ते किती अन्वयार्थक होते आणि औचित्याचे आहे, हे आज कळते. सामाजिक परिस्थिती बदलते, कवी तसा प्रतिसाद देत राहतात. व्यावसायिक आयुष्यात नीतिमत्ता, चारित्र्य, समता व दर्जा अशी मूल्ये मानून वाटचाल सुरू आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, उद्योजकांच्या माध्यमातून संमेलन लोकाभिमुख होण्यास मदत होत आहे. जयंत लंगडे यांनी सूत्रसंचालन केले.

कवीकट्टा बहरला...

कवीकट्ट्यासाठी महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला असून, १७६२ कवितांमधून ४५० कवितांची निवड कट्ट्यासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये बृहन्महाराष्ट्रातील १४० कविता आहेत. जपान आणि अबुधाबी येथूनही एकेक कविता आली आहे. २२ तास २२ सत्रांत कवीकट्टा सुरू राहणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.

आजी-माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन

स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : सातारा नगरीत नववर्षाची सुरुवात साहित्यसूर्याच्या तेजाने झाली. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिमाखदार उद्‌घाटनानंतर ग्रंथप्रदर्शनाच्या उद्‌घाटनाने संमेलनाचे बिगुल खऱ्या अर्थाने फुंकले गेले. संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झालेल्या या समरोहाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी उपस्थित होते. याशिवाय सातारा जनता सहकारी बॅंक लि.चे संचालक आणि सर्व सदस्य मंडळांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाशन संस्थांची मार्गावर दुतर्फा दालने

संमेलनाच्या मुख्य सभामंडपापर्यंत जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा असलेल्या प्रकाशन संस्थांची दालने हे यंदाच्या साहित्य संमेलनाचे वेगळेपण होय. संमेलनाच्या मुख्य मंडपाला लागूनच ग्रंथदालन उभारण्यात आले आहे. कवीकट्ट्याच्या उद्‌घाटन प्रसंगी गाडगेबाबांच्या वेशभूषेत उपस्थित असलेल्या फुलचंद टिळक यांनी लक्ष वेधले.‌ सोलापूर जिल्ह्यातील ६८ वर्षीय टिळक हे यापूर्वी साताऱ्यात झालेल्या संमेलनातही याच वेशभूषेत उपस्थित होते. त्यांची उपस्थिती लोकपरंपरा, समाजप्रबोधन आणि साहित्य यांचे भावनिक नाते अधोरेखित करणारी ठरली. बालवाचक कट्टयाचे उद्‌घाटन शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले.

“प्रिय उमर, आम्ही सगळे..."; न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचे तुरूंगात असलेल्या उमर खालिदसाठी पत्र

"सन्माननीय अध्यक्ष..." म्हणत संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांचा 'तो' व्हिडिओ केला शेअर

"मशीन तर तू बांगलादेशी असल्याचं सांगतेय..."; UP पोलिसांच्या 'अविष्कार'चा Video व्हायरल

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं