शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जवळचे समजले जाणारे, पिंपरी चिंचवडचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे सिनेट सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरणारे ॲड. वैभव थोरात यांनी गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीपूर्वी थोरात यांनी केलेला हा प्रवेश युवा सेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार प्रयत्न सुरू आहेत. त्याला बऱ्याचदा यशही येत असताना दिसत आहे. युवासेनेचे कार्यकर्ते आणि मुंबई विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी गुरुवारी सायंकाळी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे, शिवसेना नेते यशवंत जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रशासकीय कारभार एकहाती सांभाळणारे आणि दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेले मारुती साळुंखे उपस्थित होते. वैभव थोरात यांनी सिनेट सदस्य पदी असताना मुंबई विद्यापीठामध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या, नेहरू ग्रंथालयामध्ये कोट्यवधीची धुळखात पडलेली पुस्तके, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच मुंबई विद्यापीठाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या आयडॉलच्या सक्षमीकरण अशा विषयांवर आवाज उठवला. तसेच हे मुद्दे तडीस लावले. थोरात यांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन काम करत विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून भर सिनेटमध्येच कुलगुरूंना धारेवर धरून त्यांना तोडगा काढण्यास भाग पाडले आहे. सिनेट सदस्य म्हणून विद्यापीठामध्ये युवासेनेची भूमिका आक्रमकपणे मांडतानाच थोरात यांनी अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरून त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. त्यामुळे ॲड. वैभव थोरात हे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा चेहरा म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे ऐन करोनामध्ये थोरात यांनी सलग दीड वर्ष रस्त्यावर झोपणाऱ्या कष्टकरी व गरीबांना एकवेळचे जेवण पुरविण्याचा महायज्ञ हाती घेतला होता. या कालावधीमध्ये त्यांनी जवळपास एक लाखांपेक्षा अधिक गरीबांना जेवण पुरवले. याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेकडून घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख या नात्याने थोरात यांनी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सतत कार्यक्रम देऊन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे ऐन सिनेट निवडणुकीपूर्वी ॲड. वैभव थोरात यांचे शिवसेनेमध्ये प्रवेश करणे हा युवासेनेसाठी मोठा धक्का समजला जात आहे.