पुणे : स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने (LBSNAA) महाराष्ट्र सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी अंशतः अंध असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. तसेच, त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही जास्त रुबाब दाखवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला यूपीएससीनेही आव्हान दिले होते. यूपीएससीने खेडकरांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) मध्ये आव्हान दिले होते. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने पूजा खेडकरांविरोधात निर्णय दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या विरोधात निर्णय देऊनही त्यांचे एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारण्यात आले, ज्यामुळे त्यांची आयएएस नियुक्ती निश्चित झाली. अपंगत्वाच्या दाव्याव्यतिरिक्त, पूजा खेडकरच्या ओबीसी नॉन-क्रिमी लेयर दर्जाच्या दाव्यांमध्येही विसंगती आढळून आली आहे.
गाडीवर लाल दिवा लावल्याप्रकरणी कारवाई
दरम्यान, पूजा खेडकरांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दमदाटी केल्याचे समोर आले आहे. सगळ्यांनाच आतमध्ये टाकेन, असे बोलत पूजा खेडकरांच्या आईने पोलिसांना दमदाटी केली, तसेच बंगल्याच्या गेटला आतून कुलूप लावून पोलिसांना गेटबाहेरच उभे केले होते. दरम्यान, पुणे वाहतूक पोलिसांनी गाडीवर लाल दिवा लावल्याप्रकरणी २१ हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे.