मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचणाऱ्या खेळाडूंवर राज्य मंत्रिमंडळाने कोट्यवधींच्या बक्षीसांची लयलूट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्यानुसार आता ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदके पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंवर कोटींची उधळण करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक वैयक्तिक प्रकारातील सुवर्णपदक विजेत्याला प्रत्येकी ५ कोटी रुपयांचे पोरितोषिक देण्यात येईल. तसेच रौप्य व कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे ३ व २ कोटी देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच मार्गदर्शक व प्रशिक्षकांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
तसेच सांघिक खेळात (जसे हॉकी, फुटबॉल) ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्यांना ३.७५ कोटी, रौप्य विजेत्यांना २.२५ कोटी, तर कांस्य विजेत्यांना १.५० कोटी देण्यात येतील. त्यांच्या प्रशिक्षकांना अनुक्रमे ३७.५० लाख, २२.५० लाख व १५ लाख देऊन गौरवण्यात येणार आहे.
त्याशिवाय जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या राज्यातील खेळाडूंना आता ३ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. रौप्य व कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे २ व १ कोटी देण्यात येतील. त्यांच्या मार्गदर्शकांना ३०, २० व १० अशा स्वरूपात पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.
सांघिक प्रकारात जागतिक सुवर्णपदक मिळवणाऱ्यांना २ कोटी २५ लाख, रौप्यपदक जिंकणाऱ्यांना १ कोटी ५० लाख, तर कांस्यपदक विजेत्यांना ७५ लाख रुपये देण्यात येतील. त्याशिवाय मार्गदर्शकांना २२ लाख ५० हजार, १५ लाख व ७ लाख ५० हजार अनुक्रमे अशा स्वरुपाचे पारितोषिक देण्यात येईल. त्यामुळे आता खेळाडूंनाही पदक जिंकण्यासाठी आणखी प्रेरणा मिळणार आहे.
आशियाई विजेत्यांनाही भरघोस वाढ
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्यांना आता एक कोटी रुपये देण्यात येतील. तसेच रौप्य पदकासाठी ७५ लाख, तर कांस्यपदकासाठी ५० लाख राज्य शासनाकडून देण्यात येतील. त्याशिवाय त्यांच्या मार्गदर्शखांना अनुक्रमे १० लाख, ७.५० लाख व ५ लाख देण्यात येतील.
सांघिक खेळात आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदकासाठी ५६ लाख २५ हजार, तर कांस्य पदकासाठी ३७ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. मार्गदर्शकांना अनुक्रमे ७ लाख ५० हजार, ५ लाख ६२,५००, ३ लाख ७५ हजार असे बक्षीस देण्यात येईल.
महाराष्ट्राचे यंदा दोन पदकवीर
पॅरिसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने १ रौप्य व ५ कांस्य अशी ६ पदके जिंकली. यामध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळेचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण २९ पदकांची कमाई करून पदकतालिकेत १८वे स्थान मिळवले. त्यात महाराष्ट्राचा गोळाफेकपटू सचिन खिलारीचा समावेश होता. सचिनने रौप्यपदक पटकावले होते. चार वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. मात्र यंदा भारताने २९ पदकांना गवसणी घालून आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या सर्वांना केंद्र शासनाकडून मागेच रोख पारितोषिक देण्यात आले. मात्र आता राज्य शासनाने महाराष्ट्रातील खेळाडूंनाही रोख पारितोषिक देण्याचा निर्णय घेत खेळाडूंची मने जिंकली आहेत.