महाराष्ट्र

'आता लवकर घरी परत ये...'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना, Video

हा कुणाचा पराभव किंवा विजय म्हणून पाहू नये, अभिजीत दिपकेंचे वडील भगवान दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या निर्णयाचाही उल्लेख केला...

Mayuri Gawade

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या आंदोलनात सक्रिय भूमिका बजावणारे कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या घरी मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मुलाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आई अनिता दिपके आणि वडील भगवान दिपके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"घरी आला की त्याचं औक्षण करणार"

अभिजीतची आई अनिता दिपके म्हणाल्या, "मी त्याला आता लवकर घरी ये, असं सांगणार आहे. तो आला नाही तर आम्हीच जाऊन त्याला घेऊन येऊ. त्याला मिठी मारेन आणि औक्षण करेन. याआधी तो घरी आला होता, तेव्हा 'मी काही मोठा माणूस नाही,' असं म्हणत त्याने औक्षण करू दिलं नव्हतं."

त्या पुढे म्हणाल्या, "आज खूप आनंद होत आहे. त्याच्या प्रामाणिकपणाचा विजय झाला. देशभरातील तरुणांनी त्याला साथ दिली आणि त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालं."

अनेक दिवस झोपही लागली नाही

अनिता दिपके यांनी सांगितले की, अभिजीतने अमेरिकेतून भारतात येऊन आंदोलन सुरू केल्यापासून त्यांची सतत चिंता होती. जंतरमंतरवरील आंदोलन सुरू झाल्यानंतर तर रात्री झोपही लागत नव्हती.

"सकाळी मोबाईल पाहायलाही भीती वाटायची. एखादी वाईट बातमी किंवा व्हिडिओ दिसेल, अशी भीती होती. त्यामुळे मी रोज त्याच्या मित्रांना फोन करून त्याची विचारपूस करायचे," असे त्यांनी सांगितले.

'धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे तरुणांचा विजय'

अनिता दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला देशातील तरुणांचा विजय म्हटले. मात्र, अभिजीत पुढे राजकारणात उतरेल असे त्यांना वाटत नसून, तो सामाजिक क्षेत्रातच काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"आम्ही सतत भीतीत होतो"

अभिजीतचे वडील भगवान दिपके म्हणाले की, कुटुंबात कुणीही राजकारणात नसताना अभिजीतने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी त्याला विरोधही केला होता. त्यांनी सांगितले की, जूनमध्ये अभिजीत अमेरिकेतून भारतात येऊ नये, अशीही त्यांनी विनंती केली होती. अटकेची भीती आणि धमक्यांमुळे काही दिवस कुटुंबाला घर सोडून कोकणात जाऊन राहावे लागले.

"एका पोळीवर दिवस काढले"

भगवान दिपके म्हणाले, "तणाव इतका वाढला होता की, आम्हाला व्यवस्थित जेवणही जात नव्हतं. दिवसातून एकच पोळी खायचो. झोप लागत नव्हती. आंदोलनादरम्यान अभिजीतवर दोनदा हल्लाही झाला." २० जुलै रोजी पोलिसांनी अभिजीतचा माईक काढून घेतल्याचा प्रसंग पाहून आपण घाबरलो होतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानांबद्दलही व्यक्त केला आदर

भगवान दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या निर्णयाचाही उल्लेख केला. "इतक्या मोठ्या पदाचा राजीनामा देण्यासाठी मोठं मन लागतं. त्यांनी राजीनामा देतानाही विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष द्यावं, असा संदेश दिला. त्यामुळे हा कुणाचा पराभव किंवा विजय म्हणून पाहू नये," असे ते म्हणाले.

दरम्यान, अभिजीत दिपके पुढे कोणती भूमिका घेणार, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत, "तो जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू," असेही भगवानराव दिपके यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा

'लोकशाहीने कात टाकली...'; धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

"आपण करून दाखवलं!"; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

'तिरंगा मार्च'च्या एक दिवस आधी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले - 'कुठल्याही पक्षाचा झेंडा, नेत्यांच्या घोषणा नको...

CJP Protest : अभिजीत दिपकेंना टायफॉइडची लागण; VIDEO शेअर करत म्हणाले- 'आंदोलन थांबणार नाही'