भाजप प्रवेशासाठी कुटुंबाला धमक्या; अभिजित दीपके यांचा गंभीर आरोप X
महाराष्ट्र

भाजप प्रवेशासाठी कुटुंबाला धमक्या; अभिजित दीपके यांचा गंभीर आरोप

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकार, शिक्षण व्यवस्था आणि विरोधकांच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी पेपर फुटीचे प्रकरण, पोलिसांची कारवाई आणि आंदोलक विद्यार्थ्यांना मिळालेल्या धमक्यांवर गंभीर आरोप केले.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकार, शिक्षण व्यवस्था आणि विरोधकांच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी पेपर फुटीचे प्रकरण, पोलिसांची कारवाई आणि आंदोलक विद्यार्थ्यांना मिळालेल्या धमक्यांवर गंभीर आरोप केले.

भाजपमध्ये सामील न झाल्यास कुटुंबाला अडचणीत आणले जाईल, असा इशारा आपल्याला देण्यात आला होता, असे नमूद करून ते म्हणाले की, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांसारख्या उच्च पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून एका विद्यार्थ्याला धमक्या दिल्या जात असल्याचे पाहून मला लाज वाटते, लहान मुलांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी अशा मोठ्या पदांवर बसलेल्यांचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नवीन पिढीची दिशाभूल करत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना दीपके म्हणाले, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढणे, सरकारला प्रश्न विचारणे आणि स्वतःच्या भविष्यासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करणे म्हणजे जर संस्कृती बिघडवणे असेल, तर हा संघर्ष मी असाच चालू ठेवीन.

गोळीबाराची घटना नाकारणाऱ्या भाजपवर टीका करताना दीपके यांनी सांगितले की, मी बिहारमधील रुग्णालयांमध्ये जखमी विद्यार्थ्यांना स्वतः पाहिले आहे. 'बेल्ट गन' आणि एके-४७ सारख्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि काहींना आपली दृष्टी गमवावी लागली. दहशतवाद्यांविरुद्ध वापरायची शस्त्रे विद्यार्थ्यांविरुद्ध वापरली गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, परदेशी निधीच्या आरोपांवर ते म्हणाले की, जर विद्यार्थ्यांना खरोखरच परदेशी निधी मिळाला असेल, तर हे देशाच्या सुरक्षा यंत्रणेचे मोठे अपयश आहे आणि त्याला केंद्रीय गृहमंत्रीच जबाबदार आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीला दीपके यांनी पाठिंबा दिला. अमित शाह यांनी नक्कीच राजीनामा दिला पाहिजे. कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून निधी मिळतोय किंवा हे आंदोलन बाहेरून चालवले जात आहे, असेही म्हटले जात आहे. जर असे होत असेल, तर हा अमित शाह यांच्यासारख्या व्यक्तीचा पराभव आहे.

रीप्लेसमेण्ट कॉपी

शिक्षण मंत्र्यांच्या बदलावर आणि प्रियंका गांधी- वढेरा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी नवीन शिक्षण मंत्र्यांचा उल्लेख जुन्या मंत्र्यांची केवळ "रिप्लेसमेंट कॉपी" असा केला. भाजपवर गंभीर आरोप करताना ते म्हणाले, हा पक्ष बलात्काराच्या आरोपींचे रक्षण करतो आणि त्यांचा सन्मान करतो, तर दुसरीकडे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांवर लाठ्या-काठ्या आणि गोळ्या झाडल्या जातात.

एमपीएससीचा मुद्दा

महाराष्ट्रातील वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांवर बोलताना दीपके म्हणाले की, राज्यातही एका मोठ्या आंदोलनाची गरज आहे. सरकारने पेपर फुटीप्रकरणी जलदगती न्यायालयाचे आश्वासन दिले होते, परंतु सीबीआयचे वकील उपस्थित न राहिल्याने पहिलीच सुनावणी तहकूब झाली. निवडणुकीच्या रॅली वेळेवर होतात, मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत सरकार गंभीर नाही.

जबाबदारी शहा यांचीच

राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपांचा संदर्भ देत दीपके म्हणाले की, आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेची थेट जबाबदारी अमित शहा यांचीच आहे. पोलीस दल हे थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येत असल्याने गृहमंत्र्यांना या घटनांची माहिती असणे स्वाभाविक आहे.

शेतकऱ्यांना पाठिंब्याचे आश्वासन

शेतकऱ्यांना पाठिंब्याची गरज भासल्यास सीजेपी त्यांच्या आंदोलनात पाठीशी उभी राहील, असे आश्वासन दीपके यांनी दिले. शेतकऱ्यांनाही वाटते की त्यांच्या मुलांचे करिअर यशस्वी व्हावे. यापूर्वी ते आमच्या आंदोलनात सोबत उभे राहिले होते. जर शेतकरी नेत्यांना आमच्या पाठिंब्याची गरज असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत असू, मीसुद्धा शेतकरी कुटुंबातील आहे, असे ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गंभीर नियमभंग असेल तरच होते कारवाई, "मी स्वतःला सिंघम मानत नाही"; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष मुलाखत

धनुष्यबाण कुणाचा? 'सर्वोच्च' सुनावणी सुरू

माणसे कमी, कामाचा वाढता ताण; FDA प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या मंत्र्यांकडे तक्रारी

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय एअर इंडिया इमारतीत?

CJP Protest : दिल्ली आंदोलकांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू