मुंबई : शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेचसत्ताधाऱ्यांना लगाम घालण्यासाठी शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून भास्कर जाधव यांची विधानसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले आहे.
या बैठकीला खासदार तथा सचिव अनिल देसाई, नेते सुभाष देसाई, संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत झाली. महायुती पुढे आघाडी अपयशी ठरली. राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली आहे. सध्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असताना, महायुतीच्या नेत्यांकडून शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्ष फुटला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खबरदारी घेत, निवडून आलेल्या २० आमदारांची सोमवारी मातोश्री निवासस्थानी सकाळी ११ वाजता बैठक घेतली. विधानसभेत पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी विधिमंडळाच्या कायद्याचा अभ्यास असलेल्या भास्कर जाधव यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व आमदारांनी एकमताने जाधव यांच्या निवडीला समर्थन दिले. पक्षप्रमुख यांचा निर्णय सर्व आमदारांना बंधनकारक राहील, या संदर्भातील हमीपत्र यावेळी लिहून घेण्यात आले. दरम्यान, विधानसभेतील यशावर चर्चा करताना, निकालावर संशय व्यक्त करण्यात आला.
आदित्य ठाकरेंकडे संयुक्त सभागृहाचे नेतेपद!
विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या नेतेपदाची जबाबदारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड केली आहे.