पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचे विश्लेषण करत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यावर आता काही बोलणार नाही. असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकातून त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवर बोलणे टाळले.
‘लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असून अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपने स्वतःची किंमत कमी केली’, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. आषाढी एकादशीसंदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, “मला यासंदर्भात काहीही बोलायचे नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा किंवा भूमिका स्पष्ट करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे. महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार मी करतो आहे. त्यानुसार येणाऱ्या विधानसभेत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे”.
कांद्याच्या प्रश्नामुळे फटका बसल्याची कबुली
जळगाव, नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. कांदा प्रश्न पेटल्यानंतर कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत केंद्राला आम्ही सांगितले होते. मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर येथील जागांवर महायुतीला फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो. तेव्हा अमित शहा आणि पियूष गोयल यांना देखील याची कल्पना देण्यात आली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे
राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे आहे. यावर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्वत: भुजबळ यांनी नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीदेखील माध्यमांतून अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जातात. आमचे फारच जवळचे, विरोधक आणि आमचा फार विचार करणाऱ्यांनी या बातम्या पिकवल्या आहेत, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबत फडणवीस हे नाशिक येथे काळे यांच्या अस्थी विसर्जनासाठी गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारीच मी आमचा उमेदवार अंतिम करून अर्ज भरायला जाईल, तेथे राष्ट्रवादीचेच नेते असतील, अशी कल्पना दिली होती. निवडणूक बिनविरोध होणार होती, म्हणून भाजप व शिवसेनेच्या नेत्यांना बोलाविण्यात आले नव्हते, म्हणून ते आले नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.