राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र रंगल्या आहेत. याच लग्नानिमित्त पवार आणि पाटील कुटुंब मुंबई-पुणे सोडून थेट बहरीनला रवाना झालं होतं. पवार घराण्याच्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सतत सोशल मीडियावर झळकत असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते.
चार दिवसांचा भव्य सोहळा
४ ते ७ डिसेंबरदरम्यान बहरीनमध्ये हा पारंपरिक आणि आलिशान विवाहसोहळा पार पडत आहे. ४ डिसेंबरला मेहेंदी, तर ५ डिसेंबरला हळद आणि विवाह सोहळा पार पडला. ७ डिसेंबरला ग्रँड रिसेप्शनने या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
लेकाच्या लग्नात अजित पवारांचा भन्नाट डान्स
दरम्यान सर्वात लक्षवेधी क्षण ठरला तो वरातीतील अजित पवार यांच्या जबरदस्त एन्ट्री आणि डान्सचा. सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पांढरी शेरवानी, गॉगल आणि फेटा बांधून अजितदादा ‘झिंग झिंग झिंगाट’वर मनसोक्त नाचताना दिसतात. त्यांच्या सोबत रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनीही धमाल उडवत वरातीला रंगत आणली.
या लग्नासाठी केवळ ४०० निवडक पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं आहे. काही कुटुंबीय उपस्थित राहू शकले नाहीत, तरी बहरीनमधील या रॉयल सेटअपमध्ये झालेल्या कार्यक्रमांनी पवार-पाटील कुटुंबाचा आनंद आणि उत्साह अधिकच खुलला आहे. हळदीचे आणि वरातीचे फोटो पाहताच लग्नानिमित्तचा जल्लोष, पारंपरिक वेशभूषा आणि नवदांपत्याचा देखणा लुक सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत आहे.
सोशल मीडियावर ‘पवार वेडिंग’चा जल्लोष
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या या भव्य विवाहसोहळ्याने बहरीनमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही चर्चेचा नवा विषय निर्माण केला असून पवार घराण्याची ही लगीनसराई सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.