खो-खोचा आधारस्तंभ हरपला; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्रीडाविश्वातूनही आदरांजली 
महाराष्ट्र

खो-खोचा आधारस्तंभ हरपला; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्रीडाविश्वातूनही आदरांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात धक्कादायक निधन झाले. त्यांच्या निधना पश्चात संपूर्ण राज्यासह देशभरातून शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. अजितदादा हे महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्षदेखील होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने खो-खोचा आधारस्तंभ हरपला, अशीच भावना व्यक्त केली जात आहे.

Swapnil S

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात धक्कादायक निधन झाले. त्यांच्या निधना पश्चात संपूर्ण राज्यासह देशभरातून शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. अजितदादा हे महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्षदेखील होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने खो-खोचा आधारस्तंभ हरपला, अशीच भावना व्यक्त केली जात आहे.

२००६ ते २०१८ या काळात ते संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच २०१८ ते २०२५ या काळात त्यांनी आश्रयदाते ही भूमिकादेखील बजावली. २०२५मध्ये मग पुन्हा अजितदादांनी खो-खो संघटनेची सूत्रे हाती घेतली. तसेच ते महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचेदेखील अध्यक्ष होते. अनेकदा पुण्यासह राज्यभरातील विविध क्रीडा संकुल, मैदानांची समस्या सोडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे राज्यातील क्रीडापटू अजितदादा यांचे नाव आदराने घेतात.

कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे अजितदादा केवळ विकासकामांपुरते मर्यादित नव्हते, तर महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला आधुनिक, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक दिशा देणारे ते दूरदृष्टीचे नेतृत्व होते. मातीतील खेळांवर अजितदादांचे नितांत प्रेम होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या पारंपरिक खेळाला आधुनिक ओळख, सुविधा आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. खेळाडूंसाठी दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. तसेच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून कबड्डीला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देताना मॅट कबड्डीपासून प्रो-कबड्डीपर्यंत त्यांच्या दूरदृष्टीचा ठसा उमटला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राला देशाची ‘क्रीडा राजधानी’ बनवण्याचे ध्येय ठेवले होते. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचा कायापालट, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, ‘मिशन ऑलिम्पिक’सारखे उपक्रम, परदेशी प्रशिक्षकांची नेमणूक आणि अत्याधुनिक साधनसामग्री या सर्व बाबींमध्ये त्यांनी निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही.

खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा त्यांच्या कार्यकाळातील मैलाचा दगड ठरला. मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूच्या भविष्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, हा त्यांचा ठाम आग्रह होता. या निर्णयामुळे आज हजारो खेळाडू पोलीस दल, महसूल व इतर विभागांत मानाच्या पदावर कार्यरत आहेत. वेळेचे महत्त्व जाणणारे अजितदादा पहाटे मैदानावर जाऊन खेळाडूंच्या समस्या जाणून घेत. “दादांनी शब्द दिला की काम होणारच,” हा विश्वास प्रत्येक खेळाडू व क्रीडा संघटनेच्या मनात होता. कुस्ती, नेमबाजी, जलतरण यांसारख्या खेळांनाही त्यांनी आपले मानले आणि पाठबळ दिले.

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रातील तालमी, मैदाने, ट्रॅक आणि क्रीडा संकुले पोरकी झाली आहेत. अपघाताने महाराष्ट्राचा हा ‘क्रीडा सारथी’ आपल्यातून हिरावून गेला. त्यांनी क्रीडा क्षेत्रात घालून दिलेली शिस्त, मूल्ये आणि पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

आदरांजली

❝अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.

- सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

❝अजितदादांना भेटण्याची मला अनेकदा संधी लाभली. त्यांनी मला बारामतीला येण्याचे निमंत्रणही दिले होते. मात्र आता त्यांच्या निधनानंतर तेथे जाण्याची भावना वेगळीच असेल. अजितदादांची कार्यपद्धती आणि क्रीडापटूंसाठी झटण्याची ओढ कौतुकास्पद होती. विमान अपघातात मृत्यू पावलेल्या अन्य सर्व नागरिकांच्या आत्मासही शांती लाभो, हीच प्रार्थना.

- पी. व्ही. सिंधू, भारताची बॅडमिंटनपटू

❝महाराष्ट्राच्या राजकारणातील व समाजकारणातील सर्व बाबतीत धडक निर्णय घेण्याची तडफ असणारा स्पष्टवक्ता नेता, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष सर्वसामान्यांना आपला वाटणारा व्यक्ती, भारतीय खेळांचे विशेष करून खो-खो, कबड्डी या खेळाचे तारणहार मुख्य आश्रयदाते अजितदादा पवार साहेब यांचे अपघाती दुःखद निधन झाले आहे, पूर्ण समाजकारण, क्रीडाक्षेत्र व राजकारण या सर्व क्षेत्रांची अपरिमित न भरून येणारी हानी झाली आहे. अशा या उत्तुंग नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.

- चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस

❝महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन ही संपूर्ण क्रीडाविश्वासाठी न भरून निघणारी हानी आहे. प्रशासकीय शिस्त, निर्णयक्षम नेतृत्व आणि खेळाडूंसाठी अखंड झटणारा एक खरा मैदानी नेता आपण गमावला आहे. खो-खोसारख्या मातीतील खेळाला आधुनिक ओळख, भक्कम सुविधा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. क्रीडाक्षेत्रातील पायाभूत सुविधा, ऑलिम्पिक दृष्टी आणि खेळाडूंच्या सुरक्षित भविष्यासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील. २०१० साली वियोम फाऊंडेशनने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मुंबईतील एकमेव राष्ट्रीय खो-खो स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे आयोजित केली होती, ती फक्त अजित दादांच्या एका वाक्याने ते म्हणजे ‘कामाला लागा आपण छान स्पर्धा घेऊ.’

– बाळ तोरसकर, राष्ट्रीय पंच व सहसचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन

❝खो-खो खेळातला राजा माणूस म्हणजे अजितदादा पवार. आज संपूर्ण महाराष्ट्रातील खो-खो परिवार नि:शब्द झाला आहे. महाराष्ट्रातला खेळाडू, कार्यकर्ता आणि संघटक आज पोरका झाला आहे. मागील २५ वर्षांत खो-खो खेळातील खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरी लावून देण्याचे ऐतिहासिक कार्य दादांनी केले. भारतीय खेळजगतात खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने राजा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा पवार साहेबच होते.

- गोविंद शर्मा, खजिनदार, महाराष्ट्र खो-खो संघटना

अजित पवारांवर अंत्यसंस्कारांना सुरुवात; अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लोटला जनसागर; बघा Live व्हिडिओ

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

Ajit Pawar : विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री; पण, महाराष्ट्राचे सर्वोच्च पद दूरच...

सुभाषचंद्र बोस ते अजित पवार : विमान अपघातांत देशाने गमावलेले राजकीय नेते

यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ! एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश