पुणे : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री निळकंठेश्वर पॅनल’ने निर्णायक आघाडी घेतली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मतमोजणीत अजित पवार गटाचे ‘श्री निळकंठेश्वर पॅनेल' विविध प्रवर्गांमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ‘ब वर्ग प्रतिनिधी'च्या मतदानाचा निकाल जाहीर झाला असून, त्यात अजित पवार ९१ मतांनी विजयी झाले. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गात अजित पवार गटाला ३,९२६ मते मिळाली, तर तावरे गटाला ३,५१० मते मिळाली. यामध्ये अजित पवार गटाचे रतन कुमार भोसले ४१६ मतांनी आघाडीवर होते. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातही अजित पवार गटाच्या उमेदवाराला आघाडी होती. भटके विमुक्त प्रवर्ग या गटातही अजित पवार गटाचे विलास ऋषिकांत देवकाते ७८१ मतांनी आघाडीवर होते. महिला राखीव प्रवर्गात मात्र अजित पवार गटाच्या एका महिला उमेदवाराने आघाडी घेतली होती, तर तावरे गटाच्याही ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल'च्या एका महिलेला आघाडी मिळाली होती. यावरून या प्रवर्गात ‘क्रॉस व्होटिंग' झाल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, माळेगाव ऊस उत्पादक सर्वसाधारण गटातही अजित पवार गटाचे तिन्ही उमेदवार आघाडीवर होते. पहिल्या पेटीत अजित पवार गटाचे रणजीत जाधवराव यांना ३९६ मते मिळाली, तर तावरे गटाचे गजानन काटे यांना २५० मते मिळाली. अजित पवार गटाचे बाळासाहेब तावरे ३६६ मते मिळवून, तावरे गटाचे पॅनल प्रमुख आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या ३१३ मतांपेक्षा ५३ मतांनी पुढे होते. तिसरे उमेदवार अजित पवार गटाचे राजेंद्र बुरुंगले यांना ३२१ मते मिळाली असून, ते तावरे गटाचे रमेश गोपणे (१९७ मते) यांच्यापेक्षा १२४ मतांनी आघाडीवर होते.
‘त्यांनी’ सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नयेत - शरद पवार
दरम्यान, निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नयेत. मी माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही, असा टोला अजित पवारांचे नाव न घेता त्यांनी लगावला.
शरद पवार, रंजन तावरे यांना धक्का
माळेगाव साखर कारखान्यासाठीच्या निवडणुकीत चार प्रमुख पॅनेल रिंगणात होते. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनेल’, शरद पवार समर्थित ‘बळीराजा पॅनेल’, भाजप नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’, तसेच कष्टकरी शेतकरी समिती आणि अपक्षांचे एक पॅनेल यांचा समावेश होता. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत ‘निळकंठेश्वर पॅनेल' आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासह तावरे यांनाही धक्का बसल्याचे मानले जात आहे.