संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल; "ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच...

"पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे एकमेव लक्ष्य कुठे आणि कसा भ्रष्टाचार करून पैसा कमावता येईल," अशी टीका अजित पवार यांनी केली.

किशोरी घायवट-उबाळे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.२) पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. “माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र, ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच मी सरकारमध्ये बसलो आहे,” असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

"पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे एकमेव लक्ष्य कुठे आणि कसा भ्रष्टाचार करून पैसा कमावता येईल," अशी टीका अजित पवार यांनी केली. "भाजप सत्ताकाळात पालिकेच्या ८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या असून, त्या पैशांतून नेमकी कोणती कामे झाली, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे," असे आव्हान पवारांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरली असून, रस्ते, शिक्षण, कुत्र्यांची नसबंदी यासारख्या विविध प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी भाजपकडे शहराच्या विकासाचे कोणतेही स्पष्ट व्हिजन नसल्याचे सांगत, पिंपरी-चिंचवडच्या जनतेने ‘घड्याळ-तुतारी’ युतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. “मी जे बोलतो ते करून दाखवतो. पिंपरी-चिंचवडमध्ये रोज पाण्याची व्यवस्था करण्याची ताकद माझ्यात आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या सत्ताकाळात कर्जरोखे काढून महानगरपालिकेवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज लादण्यात आले, तसेच टेंडर प्रक्रियेत रिंग करून पैसे लाटण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “टेंडरमध्ये दादागिरी केली जाते. मी जे आरोप करतो, त्याचे पुरावे देईन. पुराव्याशिवाय मी कोणावरही बिनबुडाचे आरोप करत नाही,” असे स्पष्ट करत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. सव्वा किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी तब्बल ८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, यावरून पालिकेतील भ्रष्टाचार किती वाढला आहे, याचे चित्र स्पष्ट होते, असे अजित पवार म्हणाले. “आम्ही कधी सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही. मात्र, सत्ताधारी भाजपला सत्तेची मस्ती, नशा आणि माज चढला आहे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.

Mumbai : मालाडवासीयांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम; वायफाय आधारित आधुनिक कॅमेऱ्यांची नजर, पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ठरणार उपयुक्त

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

तीन वर्षीय विधी CET प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेकडे रवाना; साडेसहा फूट उंच भव्य मूर्ती न्हावाशेवा बंदरातून परदेशी वारीला

समुपदेशनाद्वारे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आरोग्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी