पुणे : भाजपने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासोबत युती न करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला आहे. अजितदादांनी स्वत:हून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून याबाबत संवाद साधला. महाविकास आघाडीला सोबत घेण्यासाठी अजित पवारांकडून चाचपणी करण्यात आली आहे. यावेळी आघाडीविषयी दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक बोलणी झाल्याचेही समजते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार नसल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही महानगरपालिका आपल्याकडेच राखण्यासाठी अजितदादांची कसोटी लागणार आहे. त्यामुळेच अजित पवारांनी आता काँग्रेसपुढे मैत्रीचा हात पुढे करून भाजपशी दोन हात करण्याची रणनीती आखली आहे.
काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवार यांनी सतेज पाटलांसोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींसह महाविकास आघाडीसोबत मोट बांधण्याचे अजित पवारांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. अजितदादांनी आपल्याशी संपर्क साधल्याचा वृत्ताला सतेज पाटील यांनी दुजोरा दिला आहे. ‘सोबत आलात तर एकत्र लढू, भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी एकत्र आले पाहिजे,’ अशी गळ अजित पवार यांनी सतेज पाटलांना घातल्याचे सूत्रांकडून समजते.
गेल्या १० वर्षात अजित पवार यांचे अनेक विश्वासू साथीदारही भाजपने गळाला लावले. आताही महापालिका निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांचे जवळपास डझनभर मोहरे भाजपने आपल्याकडे खेचले. नगर पंचायत आणि नगपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. आताही महापालिका निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांचे जवळपास अनेक नेते भाजपात गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या या कृत्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. मविआ आणि इतर पक्षांची भाजप विरोधात मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याची चाचपणी त्यांनी कॉंग्रेसपासून केली असल्याचे बोलले जात आहे.