मुंबई : सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदा उत्खनन होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाई रोखा, असा दम भरत असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ वायरल झाला होता. या प्रकरणानंतर अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यास सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सोलापूरच्या माढा तालुक्याच्या कुर्डू गावातून अवैध उत्खननची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूरच्या महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या पथकासह कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि अजित पवार यांनी फोनवरून डिसपी अंजना कृष्णा यांना दम भरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. अंजना कृष्ण यांना दम भरल्याप्रकरणी अजित पवारांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जी काही कायदेशीर करायची आहे, ती झालेली आहे. या प्रकरणाची अजून माहिती आणि रिपोर्ट माझ्याकडे आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपोर्ट मागितला आहे. अजित पवार यांनीही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे, याची आपल्याला कल्पना नसते. अनेकवेळा आमच्याकडे निवेदन येतात. त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा, असे लिहितो, पण त्या निवेदनावर सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतो. अशावेळी संबंधित अधिकारी नजरेस आणून देतात की, आपण जरी कारवाई करा म्हटलं असले, तरी संबंधित व्यक्तीने दिलेली वस्तुस्थित बरोबर नाही. खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारवर कामे होतात. त्यामुळे यासंदर्भात अजित पवार यांनी खुलासा केलेला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल रिपोर्ट जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवला आहे. त्यामुळे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणावर कारवाई होते, हे पाहावे लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.