मुंबई : बीड सरपंच हत्या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या प्रकरणाचा चेंडू उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला.
दिल्लीतील एका सभेनंतर फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. याआधी काही तासांपूर्वी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली होती.
धनंजय मुंडे आणि माझी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी सकाळी भेट झाली. ते आमच्या सरकारमधील मंत्री आहेत आणि आमच्या भेटीत काहीही गुपित नाही. ते मला केव्हाही भेटू
शकतात आणि मी त्यांना
केव्हाही भेटू शकतो, असे फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अजित पवार यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरील भूमिकेबाबत वक्तव्य केले आहे. अजित पवार जी भूमिका घेतील ती अंतिम असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
डिसेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर मुंडे हे अडचणीत आले आहेत.