राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखलं जातं. बऱ्याचदा अजित पवार यांच्या वक्तव्यांमुळे वाद देखील निर्माण होतो. आता त्यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे अजित पवार यांच्यावर सर्वस्तरातून टीका होताना दिसत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना सारथी सारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना अधिक सुविधा कशा मिळतील यावर सभागृहात चर्चा पार पडली. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विधान परिषदेत म्हणाले की, सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यावर अजित पवार यांनी दिलेलं उत्तर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत बेजबाबदार पणाचं असल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे.त्यांच्या या विधानामुळे ते ट्रोल होत आहेत. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याकडून देखील अजित पवार याच्या वक्तव्याचा निषेध करत नाराजी व्यक्त केली गेली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपूर इथं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी विधान परिषेद प्रश्नोत्तराच्या तासावेळी सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या मुद्यावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, "पीएचडी करु इच्छिणारे विद्यार्थी आशेवर होते की त्यांना सारथीकडून फेलोशिप मिळणार आहे." यावर अजित पवार म्हणाले की, "फेलोशिप घेऊन ते काय करणार आहेत?" यावर सतेज पाटील यांनी ते पीएचडी घेतील असं उत्तर दिलं. यावर अजित पवार यांनी पीएचडी करून ते काय दिवे लावणार आहेत?, असं उत्तर दिलं. अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे सभागृहात सर्वांनाच धक्का बसला. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी अजित पवार यांनी दिलेल्या उत्तर ऐकून डोक्याला हात लावला. भाई जगताप म्हणाले की, दादा असं काय म्हणताय तुम्ही? या योजनेमुळे राज्यात पीएचडीधारकांची संख्या वाढेल. बार्टी, सारथी किंवा महाज्योतीसाारख्या संस्थांमुळे पीएचडी धाराकांची संख्या वाढून राज्यालाच त्याचा फायदा होईल. त्याने काहीही नुकसान होणार नाही.
या प्रकरणी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार अशी अट राज्यसरकारने नंतर लावली. अर्ज करण्याआधी तुम्ही विद्यार्थ्यांना हे सांगायला हवं होतं. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली, तुम्ही कट ऑफ डेट जाहीर केली आणि आता राज्य सरकार फक्त २०० फेलोशिपची अट ठेवत आहे. त्यामुळे यात सुधारणा करणं आवश्यक आहे.तुम्ही ही अट पुढच्या वर्षीपासून लागू करा, अशी आमची मागणी आहे.
अजित पवारांचं उत्तर
सतेज पाटील यांनी केलेल्या मागणीवर बोलताना अजित पवार म्हणाले, यावर आम्ही फेरविचार करु. त्यांची(सतेज पाटील यांची) मागणी मान्य होईल असं सांगता येत नाही. गरजेचं असेल तर साहानुभूतीपूर्वक विचार करु. मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह, आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस आणि इतर स्पर्धा परिक्षांमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. यंदा एमपीएससी,यूपीएससीत आपल्या पोरांनी मोठं यश मिळवलं. विद्यार्थ्यांनी या परिक्षांवर लक्ष केंद्रीत करावं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, खारघर (नवी मुंबई) आणि नाशिकमध्ये आपण(राज्य सरकार) सारथीचं केंद्र उभं करणार आहोत, असं देखील अजित पवार म्हणाले.