धनंजय कवठेकर/अलिबाग
श्रीवर्धन-दिवेआगर येथे विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या समुद्रातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य करण्यापेक्षा दुर्घटना घडण्याची शक्यता आधीच ओळखून ती टाळण्यावर भर देण्याची भूमिका घेत अलिबाग परिषदेचे सभापती प्रशांत नाईक यांनी अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व जीवरक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या अलिबाग समुद्रकिनारी चार पुरुष आणि एका महिला जीवरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बचावकार्यासाठी एक स्पीडबोट, स्ट्रेचर, लाइफ जॅकेट्स तसेच भरती-ओहोटीच्या सूचनांसाठी सायरनची व्यवस्था उपलब्ध आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांची तैनाती, बचावबोट, सुरक्षा साधने, पर्यटकांची वर्दळ असलेली ठिकाणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची यंत्रणा यांचा प्रशांत नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे आणि अभियंता मुंडे यांनी आढावा घेतला.
केवळ जीवरक्षक आणि बचावबोट उपलब्ध असणे पुरेसे नसून, कोणत्या ठिकाणी, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या वेळी अधिक धोका निर्माण होऊ शकतो, याचा पूर्वअंदाज घेऊन आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे, यावर नाईक यांनी भर दिला.
पर्यटकांना समुद्राची भीती वाटावी, अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने असायला हव्यात. पर्यटकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून, समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रशांत नाईक, सभापती अलिबाग परिषद