पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचे परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण हे अत्यंत कणखर बनले आहे. यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या धोरणात्मक निर्णयांचा सगळ्यात मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित भव्य सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणाऱ्या राष्ट्रीय 'लोकमान्य टिळक पुरस्कारा' ने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहा म्हणाले की, डोवाल हे भारताचे आजवरचे सर्वाधिक काळ सेवा बजावणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ठरले असून, भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करणे, लष्करामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि कठीण प्रसंगात कठोर निर्णय घेणे यात त्यांचा अनुभव नेहमीच मोलाचा ठरला आहे, असे त्यांनी नमूद केले.
डोवाल यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे केवळ अहमदाबादमधीलच नव्हे, तर देशभरातील १३ बॉम्बस्फोटांच्या प्रकरणांचा एकाच वेळी उलगडा करण्यात गुजरात पोलिसांना यश आले होते, असे गौरवोद्गार गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे काढले.
आयपीएस अधिकारी असलेले अजित डोवाल यांनी आपल्या सेवेच्या सुरुवातीलाच केरळ केडर सोडून गुप्तचर विभागात दाखल होण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता. पाकिस्तानात सलग सहा वर्षे अत्यंत गुप्तपणे वास्तव्य करून त्यांनी भारतासाठी जी महत्त्वाची माहिती गोळा केली, ती देशाच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक ठरली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मजबूत कणा मानल्या जाणाऱ्या 'मल्टी एजन्सी सेंटर' या संस्थेची स्थापना डोवाल यांनीच केली होती, जी आजदेखील देशाच्या गुप्तचर यंत्रणेत कळीची भूमिका बजावत आहे असे शहा यांनी नमूद केले.
टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शहा यांनी विनम्र अभिवादन केले.
चाणक्याचा गौरव -देवेंद्र फडणवीस
राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना 'चाणक्य' मानले जाते, अशा अजित डोवाल यांना आज मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील 'चाणक्य' म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः उपस्थित राहिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मनमानी म्हणजे स्वातंत्र्य नव्हे - डोवाल
आजच्या तरुण पिढीला उद्देशून डोवाल म्हणाले, 'आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रेरक, अद्भुत सेनानी, विचारवंत आणि मार्गदर्शक लोकमान्य टिळक यांची ही पुण्यतिथी आहे. आजच्या युवकांनी लोकमान्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे; पण स्वातंत्र्य म्हणजे एवढेच नव्हते. ज्या काळी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य कोणामध्येही नव्हते, समाजात वेदना आणि अत्याचार होते, त्या काळी लोकमान्य टिळकांनी संघर्षाचा कठीण मार्ग स्वीकारत देशाचे नेतृत्व केले.' असे ते म्हणाले.