नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी भाष्य केल्याची व्हिडीओ फित आपल्याकडे असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला होता, ती फित व्हायरल करावी, असे प्रतिआव्हान गुरुवारी देशमुख यांनी फडणवीस यांना दिले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध भाष्य केल्याची फित आपल्याकडे असल्याचा दावा बुधवारी फडणवीस यांनी केला होता. त्यांनी ती फित व्हायरल करावी, असे प्रतिआव्हान देशमुख यांनी फडणवीस यांना गुरुवारी दिले. फडणवीस यांच्याकडे अशा प्रकारची कोणतीही फित नसल्याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. केवळ सनसनाटी निर्माण करून आरोप करण्यासाठीच फडणवीस अशा प्रकारचा दावा करीत आहेत, असे देशमुख यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
यावेळी देशमुख यांनी एक पेनड्राइव्ह दाखविला आणि त्यामध्ये फडणवीस यांच्यावर आपण जे आरोप केले आहेत त्याचा पुरावा असल्याचा दावाही केला. उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करणारे प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला होता, या आरोपाचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. आपण कोणावरही खोटेनाटे आरोप करणार नाही, असे आपण त्यांना स्पष्ट सांगितले होते, असेही देशमुख म्हणाले. प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही म्हणून ईडी आणि सीबीआय चौकशीनंतर आपल्याला कारागृहात पाठविण्यात आले, असेही ते म्हणाले.
...तर व्हिडीओ व्हायरल करू-
आपल्याला कोणी आव्हान दिले तर आपल्याकडील व्हिडीओ व्हायरल करू, आपण पुराव्याविना भाष्य करीत नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत, असेही देशमुख म्हणाले.